रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'हा' आहार घ्या, केंद्र सरकारने जारी केला डाएट प्लॅन

 

रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'हा' आहार घ्या, केंद्र सरकारने जारी केला डाएट प्लॅन 
नवी दिल्ली :  भारत सरकारने गृह विलगीकरणात बरे होणाऱ्या रुग्णांसाठी नवा डाएट प्लॅन शेअर केला आहे. या डाएट प्लॅनमुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढून बरं होण्यास मदत होईल. डार्क चॉकलेट, खिचडी, मासे, पनीरचा आहारात नियमित समावेश केल्यास रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.


बदाम, मणुके : या डाएट प्लॅननुसार कोविड-19 च्या रुग्णांनी आपल्या दिवसाची सुरुवात भिजवलेल्या बदाम आणि मणुक्यांनी करावी. बदाम तसंच मणुके हे प्रथिने आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या डाएटमध्ये या ड्राय फ्रूटचा समावेश करावा.


नाचणीचा डोसा, दलिया : कोविड-19 च्या रुग्णांनी नाश्त्यामध्ये नाचणीचा डोसा किंवा एक वाटी लापशी (दलिया) खाल्ली तर उत्तम. कोरोना रुग्णांना ग्लूटेन फ्री डाएटवरुन फायबरयुक्त डाएटकडे वळवणं हा यामागचा उद्देश आहे. या आहारामुळे पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.


गूळ, तूप : जेवणात किंवा जेवल्यानंतर गूळ आणि तूप खाण्याचा सल्ला सरकारने या डाएट प्लॅनमध्ये केला आहे. या दोन्ही पदार्थांमुळे शरीर आतून गरम राहण्यास मदत होते. सोबतच यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणकारी तत्वही असतात. 


खिचडी : रात्रीच्या जेवणात रुग्ण साध्या खिचडीचा समावेश करु शकतात. शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्त्वांचा यामध्ये समावेश असतो. 


पाणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर स्वत:ला हायड्रेट ठेवणं अतिशय गरजेचं आहे. साध्या पाण्यासह लिंबू पाणी आणि ताकही नियमित प्यायलं तर फायदेशीर ठरतं. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहिल्यास रोगप्रतिकारशक्तीही चांगली राहिल आणि अवयवांवरही दुष्परिणाम होणार नाही.


चिकन, मासे, पनीर : कोरानाबाधित रुग्णांनी प्रथिनेयुक्त पदार्थांचं सेवन केल्यास स्नायूमध्ये बळकटी येण्यास मदत होते. त्यामुळे या प्लॅनमध्ये चिकन, मासे, अंडी, पनीर, सोयाबीन आणि बदाम खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे सर्व पदार्थ प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत.


फळं, भाज्या : दररोज पाच रंगांची फळं किंवा भाज्या खाव्यात, जेणेकरुन शरीरात योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता भरुन निघेल. तज्ज्ञांच्या मते प्रत्येक रंगांच्या फळ आणि भाज्यांमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिज असतात.


डार्क चॉकलेट : गृह विलगीकरणात असलेल्या काही रुग्णांमध्ये तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते. यासाठी त्यांनी उत्तम प्रमाणात डार्क चॉकलेटचं सेवन केल्यास फायदा होऊन तणाव निवळू शकतो. डार्क चॉकलेटमध्ये 70 टक्के कोकोआ असतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post