भावकीची क्रूरता.... जुन्या क्षुल्लक वादातून दोन सख्ख्या भावांचा निर्घृण खून

 

भावकीची क्रूरता.... जुन्या क्षुल्लक वादातून दोन सख्ख्या भावांचा निर्घृण खूनबीड : किरकोळ अशा जुन्या भांडणाच्या कुरापतीवरून झालेल्या वादात दोन सख्ख्या भावांची हत्या झाली आहे. या घडनेनं बीडमध्ये खळबळ माजली आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या नागापूर या छोट्याशा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणातील आरेापी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बीड तालुक्यातील नागापूर येथील परमेश्वर साळुंके आणि राम आत्माराम साळुंके, लक्ष्मण आत्माराम साळुंके यांच्यात गेल्या महिनाभरापुर्वी किरकोळ भांडण झाले होते. सदरचे भांडण हे गावपातळीवर ज्येष्ठांच्या मदतीने सोडवण्यात आले होते. विशेष म्हणजे  एक महिना यांच्यात कुठलीही कुरबुर झाली नाही.

दरम्यान, सोमवारी रात्री परमेश्वर साळुंके याने राम आणि लक्ष्मण यांना फोन करुन शिवीगाळ केली. त्यामुळे राम, लक्ष्मण ही दोन्ही भावंड परमेश्वर शिवीगाळ करतो म्हणून त्याच्या आई, वडिलांना सागंण्यासाठी शेतातून गावात आली. परमेश्वर घरापासून हाकेच्या अंतरावर कुर्‍हाड घेवून उभा होता. राम, लक्ष्मण घराच्या दिशेने येत असल्याचं दिसताक्षणी परमेश्वरने आपल्या हातातील कुर्‍हाडीने दोघांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या अनपेक्षित हल्ल्यात राम आणि लक्ष्मण दोघेही रक्तबंबाळ झाले. घटनास्थळीच राम याचा मृत्यू झाला तर लक्ष्मण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बीड येथे दाखल करण्यात आले. परंतु, उपचारा दरम्यान दुसर्‍या भावाचाही मृत्यू  झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post