आनंदधाम फौंडेशनच्या अविरत अन्नसेवा केंद्राला आ.जगताप, तहसीलदार पाटील यांची भेट

 आनंदधाम परिसरातील अन्नसेवा पोटाबरोबरच मनालाही सकारात्मक ऊर्जा देणारी : आ.संग्राम जगताप

आनंदधाम फौंडेशनच्या अविरत अन्नसेवा केंद्राला आ.जगताप, तहसीलदार पाटील यांची भेट



नगर : आचार्यश्री आनंदऋषीजी यांची मानवसेवेची शिकवण नगरमध्ये तंतोतंत अंमलात आणण्याचे काम आनंदधाम फौंडेशनने चालवले आहे. करोनामुळे मागील वर्षी लावलेल्या लॉकडाऊनपासून गरजूंच्या जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था फौंडेशनने केली आहे. आचार्यश्रींचे स्मृतीस्थळ असलेल्या परिसरात मिळणारे अत्यल्प दरात भोजन पोटाची भूक भागवते, याशिवाय या पवित्र परिसरातील सकारात्मक उर्जाही प्रत्येकाला मिळते. अशा उपक्रमांमुळे कितीही मोठ्या संकटाला धैर्याने तोंड देण्याची ताकद मिळते, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. 

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगरमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार ठप्प झाला असला तरी पोटाची भूक भागवली जाणे अत्यावश्यक आहे. त्यातच सध्या नगर शहरात अनेक परगावचे रूग्ण विविध हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांसमोरही पोट भरायचा प्रश्न होतो. अशा सर्वांसाठीच सध्या आनंदधाम फौंडेशनची अन्नसेवा अतिशय मोलाची ठरत आहे. दररोज 500 ते 600 गरजू याठिकाणी येवून सकस, पौष्टिक भोजन पार्सल घेवून जात आहेत. या सेवेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याच्या दृष्टीने फौंडेशन प्रयत्न करीत आहे. या अन्नसेवा केंद्राला आ.संग्राम जगताप, तहसीलदार उमेश पाटील, नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी भेट देवून येथील या सेवेचे कौतुक केले. यावेळी राहुल सोनीमंडलेचा, प्रितम गांधी, नितीन शिंगवी, अनिल दुगड आदी उपस्थित होते. 

तहसीलदार उमेश पाटील यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून आताच्या काळात करोना रूग्णांना जितकी मदतीची गरज आहे, तितकीच हातावर पोट असलेल्यांनाही मदत करणे आवश्यक आहे. ती मदत करण्याचे काम आनंदधाम फौंडेशन अखंडपणे करीत असल्याचे त्यांनी म्हटले. 

आनंदधाम फौंडेशनने आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीला वर्षभरापूर्वी अन्नदानाचा नंदादीप प्रज्वलित केला. तो वर्षभरापासून अखंडपणे चालू आहे. आनंदधाम भक्तनिवाससमोर नाममात्र 10 रुपये शुल्क आकारुन रोज सकाळी 11 ते 2 यावेळेत आपुलकी आणि सेवाभाव असलेले जेवण सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. दररोज दोन वाटी भाजी, तीन चपाती, ठेचा, चटणी तसेच पुलाव, दालखिचडा असे सकस जेवण याठिकाणी दिले जाते. सेवाभाव जपताना जेवण अतिशय हायजेनिक वातावरणात आणि चांगल्या मटेरियलपासून तयार होईल याची विशेष दक्षता घेतली जाते. आतापर्यंत दोन लाखाहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. विविध सामाजिक संस्था, ट्रस्ट, शहरातील दानशूर मंडळींचे या उपक्रमासाठी सक्रिय योगदान लाभत आहे. आनंदधाम फौंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य येथील व्यवस्था पाहत असून प्रत्येकाला पोटभर जेवण मिळेल याची ते विशेष काळजी घेत असतात. फौंडेशनच्या या कार्यास मदत करण्याची इच्छा असणार्‍यांनी 9422222151, 7028050505 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रितम गांधी यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post