पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो पलटी, चालक ठार, रस्त्यावर टोमॅटोचा खच

 

पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो पलटी, चालक ठार, रस्त्यावर टोमॅटोचा खचनगर : पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात खिंडीच्या पुढे उतारावर असणार्‍या टोमॅटोने भरलेल्या आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. ही घटना दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास घडली.

डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव (जि.पुणे) येथून आयशर कंपनीचा टेम्पो (एम.एच.15, जी.व्ही.3198) टोमॅटो घेवून नाशिकच्या दिशेने निघाला होता. ८ मे रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा टेम्पो चंदनापुरी घाटातील खिंडीच्या पुढे उतारावर असतांना वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. त्यातच वाहनाला अधिक वेग असल्याने टेम्पोने रस्तादुभाजकाला जोराची धडक दिली व तो पुण्याच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर उलटला. दुर्दैवाने टेम्पोच्या खाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर वाहनातील सगळे टोमॅटो रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्याने महामार्गावर लाल टोमॅटोचा खच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनचालकाचा मृतदेह अपघातग्रस्त वाहनाच्या खाली फसल्याने तो काढण्यासाठी टोल नाक्यावरील क्रेन बोलवावी लागली. त्यानंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

या दरम्यान पुण्याकडे जाणारी वाहतुक खोळंबल्याने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला नेईपर्यंत नाशिक बाजूने दोन्हीकडची वाहतुक वळवली होती.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post