रविवारीही नगरकर घरातच...रस्त्यांवरील सामसूम कायम

 रविवारीही नगरकर घरातच...रस्त्यांवरील सामसूम कायम
नगर : नगरकरांनी विकेंड लॉकडाउनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून रविवारी सलग दुसर्‍या दिवशीही शहरात सामसूम आहे. किराणा, मेडिकल, रुग्णालये आदी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना बंदच आहेत.  रस्त्यावरील रहदारीही अत्यल्प असून लसीकरण केंद्र व शिवभोजन केंद्रावर काही प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली. संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी शहरात चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून वीकेंड लॉकडॉऊनला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिल्याने नागरिकांनी घराबाहेर येण्याचे टाळले. रस्त्यावर तैनात असलेले पोलीस नजरेस पडणार्‍या नागरिकांची चौकशी करीत होते. कामगार, सरकारी कर्मचारी तसेच ज्यांना हॉस्पिटलच्या संदर्भात काम आहे त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही. मात्र, जे विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसले त्यांना समज देत पोलिसांनी काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली. शहरातील कापड बाजार, नवी पेठ, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, माळीवाडा, सावेडी, बालिकाश्रम रोड, पाईपलाईन रोड, मुकुंदनगर, केडगाव आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एसटी बस सेवा सुरू आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे नागरिकांनी प्रवास टाळल्याने बसस्थानकातही प्रवाशांची गर्दी नाही. बहुतांशी बस मोकळ्याच धावताना दिसल्या तर प्रवासी नसल्याने बसच्या काही फेर्‍या रद्द करण्यात आल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post