नियम पाळण्यासाठी सरपंच घालतायत लोकांना साष्टांग दंडवत

नियम पाळण्यासाठी सरपंच घालतायत लोकांना साष्टांग दंडवत नगर: करोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने संचारबंदी लागू केली, नियम कडक केले. गावातही करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. प्रबोधन केले, दंवडी दिली तरीही ग्रामस्थ ऐकत नाही. गावाच्या पारावर गप्पा मारत बसतात. अशा ग्रामस्थांसमोर शेवटी सरपंचाने साष्ट्रांग दंडवत घालण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा कोठे ग्रामस्थ विनाकरण गर्दी करणे टाळू लागले आहेत. आपल्यासमोर गावचा सरपंच लोटांगण घालताना पाहून ग्रामस्थांवर फरक पडतो. नगर तालुक्यातील कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी हटवादी ग्रामस्थांसमोर हतबल झाल्याने हा अनोखा मार्ग स्वीकारला आहे. नागरिक नियम पाळत नसल्याने करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, तरीही नागरिक यातून बोध घेताना दिसत नाहीत. नगर -पुणे महामार्गावर नगर तालुक्यातील कामरगाव येथेही अशीच स्थिती आहे. संचारबंदीचे नियम कडक केले असले तरी ग्रामस्थ आपल्या सवयी सोडण्यास तयार नाहीत. उन्हाळ्यामुळे अनेकांच्या शेतातील कामे बंद आहेत. हे ग्रामस्थ गावातच असतात. पारावर बसून गप्पा मारणे, पत्ते खेळणे, मोबाइलवर गेम खेळत बसणे याशिवाय भाजी आणि किराणा दुकानात गर्दी, वेशीजवळ, अन्य सार्वजनिक ठिकाणी रेंगाळून गप्पा मारणे असे प्रकार होत असल्याचे दिसून येते. दुसऱ्या लाटेत गावातील २५ ते ३० लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील दहा-बारा जण अद्याप उपचार घेत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून लोकांना सतत आवाहन केले जात आहे. विविध माध्यमांतून गावकऱ्यांचे प्रबोधन केले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post