कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वृद्धावर नगर जिल्ह्यातील तहसीलदारांनी केले अंत्यसंस्कार

 कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वृद्धावर नगर जिल्ह्यातील तहसीलदारांनी केले अंत्यसंस्कार

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सहनशीलतेची पारनेर तालुक्यात चर्चा
पारनेर : तालुक्यातील किन्ही येथील गोमा यशवंत खोडदे या ७८ वर्षीय वृद्धाचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर नातेवाईक न आल्याने सोमवारी तहसिलदार ज्योती देवरे यांनी प्रशासनाच्या वतीने वृद्धावर अंत्यसंस्कार केले. कोरोना महामारीमुळे, प्रशासनाच्या प्रमुख म्हणून देवरे या मृतदेहाला मुखाग्नी देत असताना उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले होते. हिंदूधर्म संस्कृतीप्रमाणे सर्व विधी देवरे यांनी यावेळी पार पाडले.


गेल्या गुरूवारी (दि.१५) गोमा यशवंत खोडदे यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने कर्जुले हर्या येथील मातोश्री रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. सुरूवातीस खोडदे यांनी उपचारास प्रतिसाद दिला. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती खालावली. शनिवारी तेथील डॉक्टरांनी खोडदे यांचा मुलगा रमेश खोडदे यांच्याशी संपर्क करून वडीलांची प्रकृती खालावली असून त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याची सूचना केली होती. परंतू रमेश कर्जुले येथे पोहचलेच नाहीत. जीवनदायी योजनेअंतर्गत असेलेले उपचाराचे बिलही मंजुर झाले नाही. त्याकडेही रूग्णालय प्रशासनानेे दुर्लक्ष केले. अखेर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोमा खोडदे यांचे रूग्णालयात निधन झाले. रूग्णालय प्रशासनाने रमेश यांना पुन्हा संपर्क साधून गोमा खोडदे यांचे निधन झाल्याचे कळविले. मात्र दुसऱ्या दिवशी येतो असे सांगण्यात आल्याने रूग्णालयाने प्रशासनाशी संपर्क करून त्यासंदर्भात माहीती दिली.


कोरोना बाधित रूग्णाचा मृतदेह अधिक काळ ठेवणे धोकेदायक असल्याने तहसिलदार ज्योती देवरे यांनी तो पारनेर येथे पाठविण्याच्या सूचना दिल्या. रमेश खोडदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तात्काळ येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यांचा एक भाऊ रूग्णालयात उपचार घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे गावातील लोकही अंत्यविधिस येऊ शकत नसल्याने व मुलानेही असमर्थता दर्शविल्याने अखेर प्रशासनानेच अंत्यविधी करण्याच निर्णय घेतला. पारनेर नगरपंचायत हद्दीतील अमरधाममध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे प्रशासनाच्या वतीने तहसिलदार ज्योती देवरे यांनी गोमा खोडदे यांच्यावर अंत्यसंस्कार केले.


यावेळी पोलिस निरीक्षक घनश्याम बळप,सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे, पारनेर नगरपंचायतीचे सचिन राजभोज, मंडलाधिकारी सचिन पोटे, तलाठी अशोक लांडे, पोलिस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, आरोग्य विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


उपस्थितांच्या अंगावर शहारे


कोरोनाच्या भितीमुळे जवळचे नातेवाईकही कोरोना बाधिताच्या अंत्यविधीकडे पाठ फिरवितात. गोमा खोडदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी तर घरातील लोकही उपस्थित नसल्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर तहसिलदार ज्योती देवरे यांनी तोडगा काढला. त्यांनी स्वतः खोडदे यांना मुखाग्नी देत हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे इतर संस्कारही पार पाडले. हे चित्र पाहताना उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post