बेजबाबदार लोकप्रतिनिधींमुळे संपूर्ण नगर शहरावर लॉकडाउन लादण्याची वेळ येऊ नये- किरण काळे

 बेजबाबदार लोकप्रतिनिधींमुळे संपूर्ण शहरावर लॉकडाउन लादण्याची वेळ येऊ नये- किरण काळे 
बेजबाबदार लोकप्रतिनिधींमुळे संपूर्ण शहरावर लॉकडाउन लादण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने सर्वसमावेशक कारवाई करावी ; 
व्यापारी, नागरिकांवर उपासमारीचे संकट येऊ नये यासाठी काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी 

प्रतिनिधी : नगर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही शहराची चिंता वाढविणारी आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे यासाठी सुरू असणारी कारवाई ही सर्वसमावेशक असावी अशी नागरिकांची भावना आहे. मात्र काही बेजबाबदार लोकप्रतिनिधींच्यामुळे संपूर्ण शहरावर लॉकडाऊन लादण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने दुजाभाव न होऊ देता सर्वसमावेशक कारवाई करावी, अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.  

याबाबतचे लेखी निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहे. काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने सुरू असणाऱ्या कारवाईचे कौतुक करण्यात आले आहे. मात्र हे कौतुक करत असताना नागरिकांच्या मनामध्ये प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कारवाईत दुजाभाव केला जात असल्याची भावना निर्माण झाल्या बाबत बोट ठेवण्यात आले आहे. 

शहरात ठीक-ठिकाणी, चौकाचौकांमध्ये नागरिकांची वाहने अडवून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जात आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता समाजामध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. काही अपवाद वगळता नागरिकही मोठ्या संख्येने प्रशासनाला सहकार्य करताना दिसून येत आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांवर दंडाची कारवाई करत असताना मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्यावतीने वसुली सुरू आहे. 

बाजारपेठेमध्ये देखील व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा प्रशासनाच्या वतीने उगारला जात आहे. व्यापारी दुकानांमध्ये सनीटायझरची (sanitizer) व्यवस्था करीत असून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना ग्राहकांना देत आहेत. काही अपवादात्मक ठिकाणी याची अंमलबजावणी होत नसली तरी बहुतांशी ठिकाणी शहरातील व्यापारी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य करीत आहेत असे किरण काळे यांनी म्हणले आहे.

काळे पुढे म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील अनेक महिन्यांच्या कठोर लॉकडाऊनमुळे बाजारपेठेचे अर्थचक्र विस्कळीत झाले असून हातावर पोट असणारे गोरगरीब कामगार, छोटे दुकानदार, व्यवसायिक, व्यापारी, कष्टकरी बांधव यांचे कंबरडे मोडले आहे. अर्थचक्र थांबू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे हे महत्वाचे असून जबाबदारीने वागणाऱ्या नागरिकांमध्ये निश्चितपणे प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्याची भावना आहे. 

मात्र एका बाजूला नागरिकांच्या वतीने तसेच बाजारपेठेतील व्यापारी वर्गाच्या वतीने प्रशासनाच्या नियमांचे पालन केले जात असताना दुसऱ्या बाजूला शहरातील बेजबाबदार लोकप्रतिनिधी स्वतः या नियमांचे उल्लंघन करताना आढळून येत आहेत. हे कमी की काय त्यांच्या अवतीभोवती असणारे बेजबाबदार लोक देखील या लोकप्रतिनिधींचे अंधानुकरण करताना दिसत असून यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या वतीने कारवाई करताना ठराविक लोकांना सूट दिली जात असून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांच्यावरच कारवाई केली जात असल्यामुळे दुजाभाव केला जात असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे. 

किरण काळे यांनी म्हटले आहे की, मध्यंतरी शहरातील एका लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त प्रशासनाला 
सनीटायझर (sanitizer) भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येत असल्याचे दाखवले जात असताना या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांच्याच तोंडावरती मास्क नव्हता. तसेच विविध ठिकाणी शहरांमध्ये भेटी देत असताना देखील लोकप्रतिनिधींच्या तोंडावर कधीच मास्क नसतो. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागणे ही काळाची गरज आहे. मात्र अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या भोवतालच्या मुठभर लोकांमुळे शहरामध्ये चुकीचा संदेश जात आहे. अशा ठिकाणांवरून कोरोना प्रादुर्भाव वाढत असेल तर ही नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. 

स्थानिक लोकप्रतिनिधी व त्यांच्या बेजबाबदारपणावर प्रश्न उपस्थित करत असताना काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ हे जबाबदारीने स्वतः कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत असून प्रशासनाच्या बैठका, सामाजिक-राजकीय कार्यक्रमाला उपस्थिती लावत असताना नागरिक तसेच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना करत आहेत असे म्हटले आहे. हीच अपेक्षा सर्व लोकप्रतिनिधींकडून असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. 

शहरातील सर्वसामान्य नागरिक व्यापारी यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये. तसेच बेजबाबदार लोकप्रतिनिधींमुळे संपूर्ण शहरावरच लॉकडाउन लादण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने सर्वसमावेशक कारवाई करावी अशी काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला मागणी करण्यात आली आहे.  कोरोना प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरामध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post