राज्यात 39 ग्रामसेवकांचा करोनामुळे मृत्यु, वारसांना तात्काळ 50 लाखांच्या विमा कवचाची रक्कम मिळावी

 राज्यात 39 ग्रामसेवकांचा करोनामुळे मृत्यु, वारसांना तात्काळ 50 लाखांच्या विमा कवचाची रक्कम मिळावी

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनची मागणी



नगर : ग्रामीण भागात करोना संसर्ग रोखण्यासाठी कर्तव्य बजावणार्‍या ग्रामसेवक संवर्गाला करोनाने मृत्यु झाल्यास शासनाने 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच दिलेले आहे. राज्यातील करोनाच्या दुसर्‍या लाटेत जानेवारी ते एप्रिल 2021 या कालावधीत 39 ग्रामसेवकांचा करोना संसर्गामुळे मृत्यु झाला आहे.  त्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये विमा कवच सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी केली आहे.

याबाबत युनियनने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीही काही ग्रामसेवकांचा कर्तव्य बजावताना कोविड संसर्ग होवून दुर्देवी मृत्यु झाला. त्यापैकी सप्टेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीतील काहींचे विमा कवच प्रस्ताव प्रलंबित आहे. याशिवाय चालू वर्षीही ग्रामसेवक अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. काम करताना त्यांना संसर्ग होत आहे. जानेवारी ते 25 एप्रिल 2021 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील 33 ग्रामसेवकांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यांचे प्रत्येकी 50 लाख विमा कवचाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेवून मयत ग्रामसेवकांच्या कुटुंबातील पात्र वारसास विशेष बाब म्हणून जिल्हा परिषद सेवेत नोकरी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post