दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्याव्या

 दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्याव्या

ऑनलाईन सर्व्हेक्षण करुन शिक्षक परिषदेने केली राज्य सरकारकडे मागणी -बाबासाहेब बोडखे


अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्याव्या, असे 69 टक्के मत विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घेतलेल्या ऑनलाईन सर्व्हेक्षणात मांडले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घेण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, खजिनदार गणेश नाकती, संघटनमंत्री सुवास हिर्लेकर यांनी दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राष्ट्रीय, समाज आणि शिक्षण हित या त्रिसूत्रीवर काम करणारी संघटना आहे. सुरक्षितता पळून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोविड प्रतिबंधक लस देणे, विद्यार्थ्यांची आरटी-पीसीआर तपासणी करणे आणि परीक्षा केंद्रावर वैद्यकीय पथकांची नियुक्ती करून आवश्यक ती सर्व वैद्यकीय साधने उपलब्ध केल्यानंतर परीक्षा घेण्यात याव्यात अशी भूमिका संघटनेच्या वतीने शासनाकडे मांडण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने भूमिका शिक्षक परिषदेने मांडली होती. परंतु कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता, तसेच कोरोना प्रतिबंधक लसीची कमतरता, औषधांचा तुटवडा आणि पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीदायक वातावरण, तर  समाज माध्यमातून सर्व स्तरावर परीक्षेविषयी चिंता व मत प्रकटन होत आहे.
या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाने कोरोना काळातील परीक्षेबाबत ऑनलाइन सर्वेक्षण केले आहे. जवळपास तीन हजार जणांनी आपले मत नोंदवले आहे. पालक, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांनी आपापली मते मांडली आहेत. यामध्ये एकूण 69.3 टक्के लोकांनी परीक्षा पुढे ढकलून ती जून किंवा जुलै मध्ये घेण्याविषयी मत मांडले आहे. यामध्ये शिक्षक 45.5 टक्के, पालक 11.7 टक्के, विद्यार्थी व नागरिक 40 टक्के आहेत. जून महिन्यात परीक्षा घेण्याचे मत 42 टक्के लोकांनी तर 33 टक्के लोकांनी जुलै महिन्यात तसेच 24 टक्के लोकांनी एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्याचे मत नोंदवले आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल का? 61 टक्के लोकांनी लोकांनी कोणतेही नुकसान होणार नाही, 38.1 टक्के लोकांनी नुकसान होईल असे मत नोंदवले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post