रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्यावतीने तंत्रज्ञांना पीपीई किटची मदत

 सरकारी व खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन यंत्रणेची तज्ज्ञांकडून तपासणी

रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्यावतीने तंत्रज्ञांना पीपीई किटची मदतनगर : नाशिक महानगरपालिकेच्या रूग्णालयात ऑक्सिजन गळतीच्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्वच खासगी तसेच शासकीय रूग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणेची तज्ज्ञांकडून तपासणी करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगर मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तंत्रज्ञांची टिम नियुक्त केली आहे. या टिममधील तंत्रज्ञांच्या सुरक्षेसाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलने 41 पीपीई किटची मदत दिली आहे. डॉ.संजय असनानी यांच्यामार्फत रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खासगीवाले, सेके्रटरी ईश्वर बोरा यांनी ही मदत रोटरीचे एजी इलेक्ट तथा तपासणी समितीचे प्रमुख प्रा.डॉ.डी.बी.करंजुले यांच्याकडे ही मदत सुपुर्द केली.
प्रसन्न खाजगीवाले म्हणाले की, सध्या प्रत्येक कोविड हॉस्पिटलमध्ये रूग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत आहे. ही यंत्रणा सुरक्षित असणे, ऑक्सिजन लिकेज नसणे अतिशय महत्त्वाचे आहे. या यंत्रणेच्या तपासणीसाठी मनपा आयुक्त गोरे यांनी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य मुकुंद सातारकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.करंजुले यांच्या नेतृत्त्वाखाली समिती स्थापन केली आहे. याअंतर्गत प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जावून तांत्रिक तपासणी, दुरुस्ती करणार्‍या तंत्रज्ञांची सुरक्षा लक्षात घेवून रोटरीने ही मदत केली आहे. याआधीही रोटरीने अमरधाम येथील अंत्यसंस्कार करणार्‍या कर्मचार्‍यांना पीपीई किट दिली आहे.
ईश्वर बोरा म्हणाले की, सध्याच्या काळात जिथे जिथे गरज भासेल तिथे रोटरी सेंट्रल मदतीचा हात देत आहे. महामारीविरुध्दची लढाई ही सामूहिक प्रयत्नातूनच जिंकली जावू शकते. त्यामुळेच रोटरीतर्फे शासकीय यंत्रणेला कोविड केअर सेंटर, अंत्यसंस्कार तसेच इतर कामात शक्य तितकी मदत करण्यात येत आहे. शहरातील सर्व शासकीय व खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सुरक्षित असणे महत्त्वाचे असून ती तपासण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करंजुले यांच्या नेतृत्त्वाखालील टिम करीत आहे. या टिमला पीपीई किटची मदत देण्यासाठी डॉ.संजय असनानी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
रोटरीचे एजी इलेक्ट प्रा.डॉ.डी.बी.करंजुले यांनी सांगितले की, या तपासणी समितीत शासकीय तंत्रनिकेतनमधील 9 व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 25 निदेशकांचा समावेश आहे. रोटरीने या कामासाठी केलेली मदत खूप मोलाची असून आता सर्व निदेशक सुरक्षितपणे आपले कर्तव्य बजावू शकतील.
डॉ.संजय असनानी यांनी या टिमच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सदर टिमचे कामकाज राज्याचे तंत्रशिक्षण संचलनालयाचे संचालक अभय वाघ, सहसंचालक नाशिक विभाग ज्ञानदेव नाठे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, आरोग्याधिकारी अनिल बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post