खूनाचे रहस्य उलगडले, पतीनेच काढला पत्नीचा काटा..

खूनाचे रहस्य उलगडले, पतीनेच काढला पत्नीचा काटा..पारनेर : पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथील पाइनच्या तलावात आढळलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले. त्या महिलेचा पतीनेच खून करून मृतदेहाला दगड बांधून तलावात टाकून दिल्याचे तपासातून पुढे आले. नंदा पोपट जाधव (वय २४, रा. चौधरीवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर), असे मृत महिलेचे नाव आहे. पोपट मारुती जाधव (रा. चौधरीवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर) असे आरोपी पतीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

धोत्रे बुद्रुक येथील तलावात ३ एप्रिल रोजी एका अनोळखी स्त्रीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. याबाबत पोपट पंजाब गांगुर्डे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात खबर दिली होती. मृतदेहाला दगड बांधलेला होता. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करत पोलीस प्रशासनाने त्या दिशेने तपास सुरू केला. चौधरीवाडी-ढवळपुरी येथील एक महिला तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी महिलेचा मृतदेह नातेवाइकांना दाखविला. त्यांनी हा मृतदेह नंदा पोपट जाधव यांचा असल्याचे सांगितले. त्यानंतर, म्हैसगाव (ता. राहुरी) येथील मयताचा भाऊ सुरेश सीताराम केदार यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता २९ मार्च रोजी नंदा जाधव व पती पोपट जाधव या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातून त्यांचे भांडणही झाले होते. त्यावेळी पतीने पत्नीला मारहाणही केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पोपट जाधव याला पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्याने पत्नीचा खून केल्याचे कबूल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद वाघ, सत्यजी शिंदे, सुरज कदम करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post