सोमवारी सकाळी ७ पर्यंत विनाकारण घराबाहेर पडणे टाळा

 शुक्रवार रात्री आठपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आणि संचारबंदी 

जिल्हावासियांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे

 जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन

रेमडेसीवीर संदर्भातील तक्रारीत तथ्य आढळल्यास होणार कडक कारवाई

 


अहमदनगर: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आठवड्याच्या शेवटी (शुक्रवारी रात्री आठ वाजलेपासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत) जाहीर केलेल्या जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अशा सर्व यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहेत. मात्र अद्यापही नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. जमावबंदी आणि संचारबंदी काळात विनाकारण बाहेर फिरु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज सर्व उपविभागीय अधिकारी , तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उदय किसवे, डॉ. अजित थोरबोले, जयश्री माळी, जयश्री आव्हाड, रोहिणी नर्‍हे, उज्ज्वला गाडेकर, पल्लवी निर्मळ, किशोर पवार, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदीची यावेळी उपस्थिती होती.

 

जिल्ह्याच्या काही भागात रुग्ण संख्या वाढीचा वेग जास्त असल्याचे दिसत आहे. त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात याव्यात. रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणीही चाचण्यांची संख्या वाढवावी. कन्टेन्टमेंट झोन भागात आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वे करुन कोरोना चाचण्या केल्या जाव्यात.  संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी आता नियोजनपूर्वक गतिमान कार्यवाही करावी. प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करुन आरोग्य धोक्यात आणणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post