व्यापारी, कामगारांना देशोधडीला लावणारे कडक निर्बंध मागे घ्यावे

 व्यापारी, कामगारांना देशोधडीला लावणारा लॉकडाऊन तातडीने मागे घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरु

सोमवार ते शुक्रवार बाजारपेठ खुली ठेवावी, वंदे मातरम्‌ युवा प्रतिष्ठान, एम.जी.रोड व्यापारी असोसिएशनची मागणी


नगर : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बे्रक द चेन अंतर्गत राज्यात करोना प्रतिबंधासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी पूर्ण बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले. असे असताना नगर जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने दि.30 एप्रिलपर्यंत सरसकट संपूर्ण बाजारपेठा, जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकानाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार व त्यांच्या अवलंबून असलेल्या कामगारांवर मोठे संकट कोसळणार आहे. अर्थचक्र ठप्प होणार असून व्यापार, व्यवसाय देशोधडीला लावणारा हा निर्णय तातडीने रद्द करून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत नियमावली तयार करून दुकाने खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरच्या बाजारपेठेतील व्यापारी, व्यावसायिकांनी केली आहे. याबाबत वंदे मातरम्‌ युवा प्रतिष्ठान, एम.जी.रोड व्यापारी असोसिएशनने जिल्हा प्रशासन, आ.संग्राम जगताप यांना निवेदन दिले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, पोलिस अधीक्षक यांनाही निवेदने पाठविण्यात आली आहेत.
आ.जगताप यांना निवेदन देताना वंदे मातरम्‌ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिक बोगावत, सचिव ईश्वर बोरा, संतोष ठाकूर, प्रतिक बोगावत, कुणाल नारंग, संभव काठेड, रवी किथानी, आदित्य भळगट आदींसह व्यापारी उपस्थित होते. ईश्वर बोरा यांनी निवेदनाबाबत सांगितले की, जिल्हा प्रशासनाने आदेश जारी करून 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावला आहे. बाजारपेठा, दुकाना 25 दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने जारी केलेले आदेश मुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या विपरित असून व्यापार्‍यांची मोठी दिशाभूल व फसवणूक केली आहे. सक्तीच्या बंदमुळे व्यापारी, त्यांच्याकडील कामगार यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ येणार आहे. गेल्या वेळच्या लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून आता कुठे व्यापारी सावरत आहेत. अशातच आता पुन्हा सर्व काही ठप्प झाल्याने बँकांच्या कर्जाचे हप्ते, व्याज, कामगारांचा पगार, शासनाचे टॅक्स, वीज बिल, जागेचे भाडे कसे भरायचे, त्यासाठी पैसे कुठुन आणायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्थकारण ठप्प करण्याऐवजी सोमवार ते शुक्रवार दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, या काळात सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजर, मास्कचा वापर या सर्व गोष्टींची व्यापारी काळजी घेतील. लसीकरणाच्या मोहिमेलाही सकारात्मक प्रतिसाद देवून जास्तीत जास्त पात्र लोकांचे लसीकरण केले जाईल. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या टोटल लॉकडाऊनचेही पालन केले जाईल. त्यामुळे प्रशासनाने 30 एप्रिलपर्यंत बाजारपेठा बंद ठेवण्याचा अध्यादेश मागे घ्यावा अन्यथा व्यापारी याला रस्त्यावर उतरून विरोध करतील. बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे व्यापार्‍यांनी स्वत:चे काही बरेवाईट करून घेतल्यास यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post