मोफत लसीकरण...घोषणेचा अधिकार मुख्यमंत्र्यांना...श्रेयवाद चुकीचा...

 मोफत लसीकरण...घोषणेचा अधिकार मुख्यमंत्र्यांना...श्रेयवाद चुकीचा...मुंबई: राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून मोफत लसीकरणाचं श्रेय घेण्यात येत आहे. त्यावरून काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन्ही पक्षांना फटकारले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करण्याआधीच त्याचं श्रेय घेणं योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे म्हटलं आहे. 

बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही जाहीर नाराजी व्यक्त केली. मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांना मोफत लस द्यावी हा आमचा आग्रह आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसा आग्रह धरला असून आमची मागणी मान्य होईल, अशी आशा आहे. मुख्यमंत्री मोफत लस देण्याबाबत विचार करत असतानाच श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्हाला हा प्रकार आवडलेला नाही. काँग्रेसची त्यावर तीव्र नाराजी आहे, असं थोरात म्हणाले. मोफत लसीकरणाच्या श्रेयाची लढाई सुरू आहे. ती योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला पाहिजे. कुणीही श्रेयासाठी घोषणा करणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post