एस.टी.चालकाला मारहाण, चौघांना सश्रम कारावासाची शिक्षा
नगर : एसटी बस चालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांना न्यायालयाने दोषी धरून एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 500 रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. शरद अशोक भोर, संदीप तान्हाजी लांडगे (दोघे रा. केडगाव), दादा गोरख पवार, पोपट भाऊसाहेब भोगाडे (दोघे रा. साकत ता. आष्टी जि. बीड) असे शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी. एन. राव यांनी हा निकाल दिला.
दि.23 मार्च 2013 रोजी रात्री बबन राजाराम बुधवंत हे त्यांच्या ताब्यातील बस नगरहून सोलापूरकडे घेऊन जात असताना कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना बस थांबविण्यास सांगितली. रात्रीची वेळ असल्याने बुधवंत यांनी बस थांबविली नाही. पुढे आर्धा किलोमीटर बस गेल्यानंतर कार चालकाने बुधवंत यांच्या बसला कार आडवी लावली. ‘तुझी बस आमच्या कारला घासली आहे’, असे म्हणत कारमधील चौघांनी बुधवंत यांना टॉमी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.बुधवंत यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. जी. पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सहायक फौजदार एस. के. भोसले यांनी सहकार्य केले.
Post a Comment