त्यांचा हेतू व मेंदू तपासण्याची गरज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांना टोला

 त्यांचा हेतू व मेंदू तपासण्याची गरज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांना टोला



मुंबई- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रंगलेला कलगीतुरा अद्याप थांबताना दिसत नाही.अजितदादांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे त्यांनी एकतर राज्य पुण्यातून चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.“अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत.'' अशा शब्दात अजित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.पवार पुढे म्हणाले की, ''भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती. टेलिव्हिजनच्या पडद्यावर चमकण्यासाठी हपापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करू नये. करोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करू नये.” असे पवार यांनी म्हंटलं आहे.“दररोज सकाळी सात वाजल्यापासून मी सर्वांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी उपलब्ध असतो. भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेट घेतात. दिवसभर फोन करतात. गेली दीड वर्षे हा कार्यक्रम अखंड सुरू आहे. लोकांच्या सतत संपर्कात राहणारा मी कार्यकर्ता आहे. मंत्रालयात आणि राज्यातील जनतेत मी कायम उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’चा हा आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासून घेण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post