नगर तालुका दूध संघात ८ कोटींचा गैरव्यवहार, २० जणांवर गुन्हा दाखल

 नगर तालुका दूध संघात ८ कोटींचा गैरव्यवहार, २० जणांवर गुन्हा दाखलनगर : नगर तालुका दुध संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाने शासनाचा कर चुकविण्याच्या उद्देशाने खोटे लेखे तयार करुन दस्तऐवजात खोट्या नोंदी केल्या.


तसेच कर्मचार्‍यांच्या देय असलेल्या रक्कमा हिशोबातुन काढून टाकत 8 कोटी 52 लाख 68 हजार 28 रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


या प्रकरणी सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक नारायण धुरपदराव गाधेकर (वय 54 रा. भुतकरवाडी, सावेडी, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 20 जणांविरूद्ध भादंवि कलम 109, 120 (ब), 406, 418, 465, 467, 468, 471, 477 (अ), 34 सह महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम- 1960 चे कलम 146 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गोरख पाराजी पालवे, उद्धव रावसाहेब अमृते, किसन बाबुराव बेरड, मोहन संतुजी तवले, कैलास अंजाबापु मते, सागर शेषराव साबळे, भाऊसाहेब गंगाराम काळे, रामदास शंकर शेळके, बजरंग किसन पाडळकर, सुभाष गंगाधर लांडगे, अर्जुन सर्जराव गुंड, राजाराम चंद्रभान धामने, मधुकर किसन मगर, भिमराज रामभाऊ लांडगे, गोरख रामभाऊ काळे, स्वप्निल बाबासाहेब बुलाखे, वैशाली आदिनाथ मते, पुष्पा शरद कोठुळे, गुलाब केरुजी कार्ले, गुलाब मारुती काळे यांचा समावेश आहे.


मार्च 2019 ते मार्च 2020 या काळात नगर तालुका दूध संघात आरोपींनी खोटे लेखे तयार केले, दस्तऐवजात खोट्या नोंदी केल्या, कर चुकविण्याच्या गैरहेतुने नियोजन करुन शासनाची फसवणुक होण्याच्या उद्देशाने संगणमताने कट करून खोटे व चुकीचे लेखे तयार केले. फसवणुकीच्या उद्देशाने कर्मचार्‍यांच्या देय असलेल्या रक्कमा हिशोबातुन काढुन निरंक (अद्रुष्य) करुन गैरव्यवहार केला.


तसे व्यवहार करण्यासाठी कर्मचार्‍यांना प्रेरीत केले. कर्मचार्‍यांच्या रक्कमा अदा करतांना जाणिवपुर्वक व अप्रामाणिक, अन्याय होण्याच्या गैरहेतुने भेदभाव करुन संशयित व्यवहार केले. संघाच्या पदाधिकार्‍यांनी संघातुन अ‍ॅडव्हान्सच्या नावाखाली निधीचा गैरव्यवहार व अपराध केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post