"ही" जोडी आता 'झी टॉकीज' वर मोगरा फुलविणार !

 "ही" जोडी आता 'झी टॉकीज' वर मोगरा फुलविणार ! 

उलगडणार ज्ञानेश्र्वरीतील अनेक प्रसंग.

व्याख्याते गणेश शिंदे व गायिका सन्मिता शिंदे यांचा संगीतमय कार्यक्रम
अहमदनगर : येथील गणेश शिंदे हे व्याख्याते म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.सहकार विभागात त्यांनी राज्यभर व्याख्याने देत महाराष्ट्र पिंजून काढला,महाराष्ट्र शासनाच्या विविध अभियानात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी आपल्या वक्तृत्वाने अनेकांची मने जिंकली. शिवचरित्र,शिक्षण व्यवस्था,उद्योजकता विकास, हे जीवन सुंदर आहे..! अशा अनेक विषयांवर त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली आहेत. तर त्यांच्या पत्नी सन्मिता शिंदे या गायिका आहेत.त्यांनी संगीत विषयात पदवी घेतली असून शास्त्रीय संगीत व लाईट म्युझिक यासाठी त्यांनी केंद्र शासनाची स्कॉलरशिप सुद्धा मिळवलेली आहे. सध्या कलर्स मराठी वर सुरू असलेल्या सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातून सन्मिता महाराष्ट्राच्या घरा घरात पोहोचल्या आहेत.या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या रूनू झुणु रुणू झुनू या माऊलींच्या अभंगाचे सर्वत्र कौतुक झाले.


आता २६ एप्रिल पासून सकाळी ७ ते ९ या वेळेत सन्मिता शिंदे व गणेश शिंदे यांचा ' मोगरा फुलला ' हा संवाद व संगीताचा एकत्रित कार्यक्रम झी टॉकीज या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमातून व्याख्याते गणेश शिंदे हे ज्ञानेश्वर महाराजांची कथा सांगणार आहेत. तर गायिका सन्मिता त्यांना गायनाची साथ करणार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या आजी आजोबांपासून तर संजीवनी समाधी पर्यंत अनेक प्रसंग या कार्यक्रमातून उलगडत जातील.तसेच कथानुरुप त्या प्रसंगाना अभंगाची जोड असणार आहे. झी टॉकीज वर प्रथमच अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांची कथा दाखविली जाणार आहे.ही कथा सांगताना वेळोवेळी गणेश शिंदे यांनी सद्य परिस्थितीवर केलेले भाष्य कधी डोळ्यात आसू आणते तर कधी चेहऱ्यावर हसू निर्माण करते.

व्याख्याते गणेश शिंदे यांचे अमोघ वक्तृत्व व सन्मिता यांचे सुरेल गायन ही रसिकांसाठी पर्वणीच आहे. गणेश शिंदे व सन्मिता शिंदे दोघेही उच्चशिक्षित आहेत. अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी असा प्रयोग करणे निश्चितच कौतुकास्पद आहे.या निमित्ताने उच्च शिक्षित युवक युवती अध्यात्मिक क्षेत्राकडे वळतील अशी अशा करायला हरकत नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post