नगर शहरात १००० ऑक्सिजन बेड वर २०० व्हेंटिलेटरचे जंम्बो कोविड सेंटर उभारावे


*मनपा ऑक्सिजन जम्बो कोविड सेंटर उभारणीच्या प्रगतीची विचारणा करण्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळाची आयुक्तांशी चर्चा ; 

मनपाने सेंटर न उभारल्यास किरण काळेंचा आंदोलनाचा इशारा ;* *प्रतिनिधी : नगर शहरातील नागरिकांसाठी मनपाने १००० ऑक्सिजन बेड, २०० व्हेंटिलेटर बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याच्या दृष्टीने काय प्रगती केली आहे याची विचारणा करण्यासाठी मनपा आयुक्त शंकर गोरे यांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन पाठपुरावा करीत चर्चा केली.* 


किरण काळे यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलील सय्यद, काँग्रेस नेते फारुख शेख, उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, एससी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, लोकेश बर्वे आदी यावेळी उपस्थित होते. 


मागील आठवड्यात महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचा नगर शहर दौरा झाला होता. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये किरण काळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी केली होती की शहरासाठी मनपाने स्वतंत्र ऑक्सिजन जम्बो कोविड सेंटर तातडीने उभे करावे. यावेळी ना. थोरात यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना वखार महामंडळसह मोठ्या जागांची चाचपणी करत जम्बो सेंटर उभे करण्याच्या दृष्टीने तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश दिले होते. 


आयुक्तांशी चर्चा करताना किरण काळे म्हणाले की, नगर शहरातील नागरिक ऑक्सिजन बेड, वेंटिलेटर बेड मिळत नाही म्हणून तडफडून मरत आहेत. कोरोना रुग्णांचे नातेवाईक आपल्या कुटुंबातील कोरोना झालेल्या सदस्याला गाडीमध्ये, ॲम्बुलन्समध्ये, दुचाकीवर वेळप्रसंगी रिक्षामध्ये घेऊन वेग-वेगळ्या हॉस्पिटलचे उंबरठे झिजवत आहेत. तरी त्यांना बेड मिळत नाही. रुग्णांची संख्या शहरामध्ये प्रचंड वाढली असून शहरातील कोरोनाग्रस्त आणि त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. 


काळे म्हणाले की, काँग्रेस नगर शहरातील नागरिकांचे ऑक्सिजन अभावी जात असणारे प्राण कदापि पाहू शकत नाही. काँग्रेसच्या सहाय्यता व मदत केंद्रावर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडसाठी रोज शेकडो फोन येतात. रोजच्या निधन वार्ता या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. हे मृत्यू केवळ उपचारच न मिळणे यामुळे होत आहेत आणि हे उपचार न मिळण्यामध्ये मनपाची अनास्था कारणीभूत आहे. नगरकरांकडून कर संकरीत करणाऱ्या मनपाला नागरिकांसाठी ऑक्सिजन जम्बो कोविड सेंटर उभे करावेच लागेल. 


काँग्रेस मनपाला या जबाबदारीतून अंग झटकू देणार नाही. ज्यावेळी नागरिक कर भरत नाहीत त्यावेळी त्यांच्या घरी वाजत गाजत करवसुलीसाठी पथक पाठविले जातात. कर न भरणाऱ्यांची यादी चौकाचौकांमध्ये फ्लेक्सवर लावून तुम्ही नागरिकांची इज्जत घेता. मग ज्यांच्याकडून कर गोळा करता त्याच नागरिकांना आरोग्य सुविधा तुम्ही देऊ शकत नसल्यामुळे त्यांचे प्राण जात आहेत ही बाब संतापजनक आहे. 


किरण काळे म्हणाले की, ही वेळ अजिबात राजकारण करण्याची नसून सर्वांनी एकत्र येत कोरोना विरुद्ध लढा देण्याची आहे. मी सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या नेतृत्व करणार्‍या आमदारांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून राजकारण बाजूला सारून नगरकरांच्या मदतीला पुढे या. आपण एकत्र मिळून हा प्रकल्प उभा करत शहरातील नागरिकांना वाचवण्याचे काम करू. 


काँग्रेसच्या मागणीवर नगर शहरातील नागरिकांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने मनपाने तातडीने सकारात्मक कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा यावेळी काँग्रेसच्यावतीने किरण काळे यांनी महानगरपालिकेला दिला आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post