निर्बंधांमुळे दूध व्यवसाय मोठ्या अडचणीत, राजेश परजणे यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष


निर्बंधांमुळे दूध व्यवसाय मोठ्या अडचणीत, राजेश परजणे यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष नगर: करोना महामारीमुळे राज्यभरात लॉकडाऊन सुरू असल्याने दुग्ध व्यवसाय सध्या मोठ्या संकटात सापडला असूनशासन पूर्ण क्षमतेने दूध स्विकारीत नसल्याने दुधावर प्रक्रिया करणारे दूध संघ व प्रकल्पांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही गंभिर परिस्थिती विचारात घेऊन शासनाने 100 टक्के दूध खरेदी करावे, अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

श्री. परजणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, करोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करण्याची वेळ सकाळी 7 ते 11 करण्यात आलेली आहे. वेळेच्या या बंधनामुळे दुधाची विक्री सुमारे 60 टक्क्यांनी तर दुग्धजन्य पदार्थांची विक्री 75 टक्क्यांनी कमी झालेली आहे. याचा विपरीत परिणाम दूध संघांवर व दूध संकलन करणार्‍या संस्थांवर झालेला आहे.

संघाला माल पुरवठा करणारे व्यावसायिक तसेच दूध उत्पादकांची देणी, कर्मचार्‍यांचे पगार, प्रक्रिया खर्च भागविणेही संघांना सध्या कठीण झालेले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडण्याची आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या श्रमजिवी वर्गावर उपासमारची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. हजारो कुटुंबांचे संसार या व्यवसायावर अवलंबून आहे.

दुग्ध व्यवसायाला व या व्यवसायाशी निगडीत असलेल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना करोना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने 100 टक्के दूध स्विकारणे गरजेचे असून दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीच्या वेळेत देखील वाढ करण्याची आवश्यकता असून याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर गांभिर्याने विचार व्हावा अशी विनंतीही श्री. परजणे यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post