भगवान महावीर जयंती घरातच थांबून साजरी करावी : सुभाष मुथा

 नगरमध्ये यंदा भगवान महावीर स्वामी जयंतीची मिरवणूक रद्द 


सर्वांनी घरातच थांबून जाप करावा व शासनाच्या निर्देशांचे पालन करावे : सुभाष मुथानगर: सध्या सर्वत्र करोनाचे थैमान चालू असून परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. राज्यात कडक लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरमध्ये यंदा दि.२४ एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती निमित्त निघणारी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. जैन बांधवांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भगवान महावीर जयंती घरीच थांबून साजरी करावी तसेच भगवान महावीर स्वामींच्या शिकवणुकीप्रमाणे समाजातील गरजूंना शक्य ती मदत करावी, गोशाळांना मदत करावी असे आवाहन कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुथा यांनी म्हटले आहे की, संपूर्ण मानवजातीला शांतता, अहिंसेचा संदेश देणार्या भगवान महावीर स्वामी यांची जयंती मनमनात उत्साह निर्माण करते. नगर शहरात दरवर्षी निघणारी भव्य मिरवणूक, चौकाचौकात होणारी आकर्षक सजावट देशात नावाजली जाते. परंतु सध्या संपूर्ण देश करोनारुपी महामारीचा सामना करीत आहे. महाराष्ट्रात सरकारने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. आताच्या परिस्थितीत प्रत्येकानेच उत्स्फूर्तपणे शासन नियमांचे पालन करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळेच यंदा नगरमध्ये मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 'भगवान महावीर मनामनात, जयंती घराघरात' हा मंत्र ठेवला आहे. नगर जिल्ह्यातील राज्यातील तसेच देशभरातील जैन बांधवांनी हा मंत्र जपतच घरी सुरक्षित राहून महावीर जयंती साजरी करावी. 

जैन समाज हा अतिशय संवेदनशील व शिस्तबद्ध आहे. नगरमध्ये तीस वर्षांपासून भगवान महावीर जयंती भव्यदिव्य पद्धतीने साजरी करण्याची परंपरा आहे. सिमंधर स्वामी मंडळाचे दांडिया पथक, जैन ढोल पथक, महिलांचा सहभाग,  चौक सजावट, मिरवणूक मार्गावर रांगोळी, गुरू भगवंतांचे भगवान महावीर यांच्या जीवनावरील व्याख्यान   असं मंत्रमुग्ध करणारे वातावरण असते. तीस वर्षांपासूनची ही परंपरा सकल जैन समाज पाळत आला आहे. देशातही याचे अनुकरण केले जाते. परंतु यंदा हा सोहळा होणार नाही. भगवान महावीर स्वामींच्या कृपेनं लवकरच जगाची या महामारीतून मुक्तता होईल व पुढील वर्षी त्याच दिमाखात आपण जयंती उत्सव साजरा करू असा विश्वास आहे.

यंदा सार्वजनिक रुपात महावीर जयंती साजरी न करता आपण प्रत्येकाने समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न निश्चित करावा. आज सगळ्यात जास्त गरज माणुसकीची आहे. करोना जातीधर्म, गरीब श्रीमंत असा भेद न करता धुमाकूळ घालत आहे. आपणही या काळात योग्य सोशल डिस्टन्सिंग राखून गरजवंताना मदतीचा हात द्यावा, गोसेवा करावी. घरीच महावीर स्वामींचे नामस्मरण करावे, नवकार जाप, पूजा अर्चा करावी.  

आताची परिस्थिती गंभीर आहे. लोकांचें जीव वाचणे, आपण स्वतः, आपला परिवार सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. हीच बाब लक्षात ठेऊन सरकारच्या प्रयत्नांना साथ देऊन महामारी रोखण्यासाठी योगदान द्यावे. कोणतेही राजकारण न करता करोना प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात असे आवाहन कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा तसेच हडको जैन मंदिराचे विश्वस्त सुधीर मेहता यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post