...तर संबंधित गावं १०० टक्के लॉकडाऊन करा

 १५ पेक्षा जास्त रूग्ण आढळल्यास गावं १०० टक्के लॉकडाऊन करा,  प्रांताधिकारी गणेश पवार यांच्या सूचनानेवासा : एखाद्या गावात 15 पेक्षा अधिक करोना रूग्ण आढळल्यास संबंधित  गावे 100 टक्के लॉकडाऊन करावीत अशी सूचना प्रांताधिकारी गणेश पवार यांनी केली.

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे प्रांताधिकारी गणेश पवार व तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांनी कोविड 19 संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यावेळी प्रांताधिकारी बोलत होते.

बैठकीसाठी नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार, तालुका वैद्यकिय अधिकारी अभिराज सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे उपस्थित होते. यावेळी सलाबतपूर व शिरसगाव गणातील कोविड 19 रोगाच्या फैलावाविषयी प्रांताधिकारी गणेश पवार यांनी माहिती जाणून घेतली.

परिसरातील करोना स्थितीचा आढावा घेताना सलाबतपूर व शिरसगाव येथील करोना रुग्ण संख्या, संपर्कातील रुग्णांचे विलगीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा, लसीकरण या विषयी प्रांताधिकार्‍यांनी माहिती जाणून घेतली. तसेच जास्तीत जास्त लसीकरण करण्यासंदर्भात सुचना केली.

करोना संक्रमितांची संख्या वाढू नये यासाठीं काय उपाययोजना करता येतील यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ज्या गावात पंधरापेक्षा जास्त रुग्ण असतील ते गाव शंभर टक्के लॉकडाऊन करण्याच्या सुचना देण्यात आल्या.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post