मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार...लसीकरणाबाबत केली 'ही' महत्त्वाची मागणी

२५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्र्यांकडे विनंती

मोठ्या प्रमाणावर युवा वर्गाला कोविड संसर्गापासून रोखणे आवश्यक



मुंबई, दि 5 : कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचविणे आवश्यक आहे, त्यामुळे 25 वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत असेही या पत्रात म्हटले आहे.

मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्री म्हणतात.

लसीकरण वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेच पण त्यासाठी केंद्राने जादा डोस देखील द्यावेत अशी विनंती करून मुख्यमंत्री म्हणतात की, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या 6 जिल्ह्यांसाठी केवळ 3 आठवड्यात 45 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी आहे, याकरिता दीड कोटी डोस मिळावेत.

केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post