खा.सुजय विखेंचा 'तो' दावा संशयास्पद... रुपाली चाकणकर यांनी केला प्रश्नमुंबई - भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्लीहून विमानाने अहमदनगरसाठी दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणले होते. या साठ्याचे वाटप केल्यानंतर त्यांनी व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. राजकारण अथवा श्रेयासाठी नव्हे तर, गरीब जनतेचे प्राण वाचविण्यासाठी हे पाऊल उचलले. मात्र, सरकार कारवाई करेल म्हणून गोपनीयता बाळगली, असे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. त्यानंतर, आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुजय विखेंचा व्हिडिओ संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून ही शंका उपस्थित केली आहे. खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिवीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी, असं आव्हानच चाकणकर यांनी दिलं आहे. त्यामुळे सुजय यांनी आणलेल्या बॉक्समध्ये खरोखरच इंजेक्शन होते का? सुजय विखेंनी व्हायरल केलेला व्हिडीओ खरा होता का? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, विखे यांनी गेल्या सोमवारी (19 एप्रिल) विमानाने हा साठा आणला. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा उतरविला. तो कोठून आणला व किती इंजेक्शन आणली हे त्यांनी जाहीर केलेले नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post