शिक्षक दाम्पत्याचा गृहउद्योग ; देशी गाईच्या शेणापासून गोवऱ्या निर्मिती

 शिक्षक दाम्पत्याचा गृहउद्योग ; देशी गाईच्या शेणापासून गोवऱ्या निर्मितीशेवगाव (संदीप देहाडराय):  :-भारतीय संस्कृतीत गो सेवेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. देशी गाईचे दूध, तूप व गोमूत्र सात्विक मानले जाते. तसेच अनादिकालापासून शेणापासून उदबत्ती व धुप निर्मितीही होते. आता तर देशी गाईच्या शेणापासून बनलेल्या गोवऱ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पूजापाठ, होमहवण, यज्ञ - याग आदी  धार्मिक विधीबरोबरच अंत्यसंस्काराच्यावेळीही गोव -याचा वापर होत असल्याने ' गवरी 'चे महत्व अधोरेखित झाले आहे. प्राचीन ऋषीमुनींच्या काळात शेणाचा उपयोग कुटी सभोवताली सडासंमार्जनासाठी होत असे.ही परंपरा आजही ग्रामीण भागात जपली जाते. सकाळी अंगणात शेणाचा हिरवागार सडा टाकून आकर्षक रांगोळी रेखाटली जाते.  
देशी गाईच्या शेणापासून बनविलेल्या गोव -याचे शास्त्रीयदृष्ट्या मौलिक स्थान आहे. नेमका हाच धागा पकडून वडुले बुद्रुक (ता.शेवगाव) येथील सचिन शिंदे व सौ. प्रांजली शिंदे या शेतकरी कुटुंबातील उपक्रमशील शिक्षक दांपत्याने लॉक डाऊनच्या काळात शेवगावच्या विद्यानगर उपनगरातील आपल्या निवासस्थानी शेणापासून गव-या निर्मितीचा घरापुरता व्यवसाय सुरू केला.सचिन शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती बेबी शिंदे यांनी या आगळ्यावेगळ्या कामाला साथ व प्रोत्साहन दिले. 
शिंदे कुटुंबीय दररोज या गोवऱ्याचा वापर पाणी व दूध तापविण्याचाबरोबरच रात्री अग्निहोत्रासाठीही करतात. आता परिचितांकडून गोव-यांना मागणी वाढली आहे, त्यातच होळीचा सण तोंडावर आल्याने शिंदे कुटुंबाची गवऱ्या निर्मितीची लगबगही वाढली आहे. शिंदे दांपत्याकडे अवघी साडेतीन वर्षाची 'कामधेनू '  नावाची देशी गाय असून तिला ' षष्ठी ' ही तीन महिन्याची कालवड आहे. कामधेनु पासून दररोज त्यांना दहा किलो शेण मिळते. त्यापासून चाळीस-पन्नास गव -या  तयार होतात. 
कडक लॉक डाऊनच्या काळात शिंदे दांपत्याला गोवऱ्या निर्मितीची शक्कल सुचली. यंत्राच्या (साचा) साह्याने ते गवऱ्या बनवितात. आज त्यांच्याकडे सुमारे पंधराशे गोवऱ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या गव-यांना परिचित व्यक्ती, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून धार्मिक विधी साठी मागणी वाढली आहे. होळीचा सण तोंडावर आल्याने मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सेवाभावी वृत्तीने अल्पदरात गोवऱ्या उपलब्ध करून देण्याची शिंदे यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post