"मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत!", आ.रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

 "मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत!", आ.रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला मुंबई - परमबीर सिंगयांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील या घटनेवरुन संसदेतही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाळा.  याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारयांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच "मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत!" असं म्हणत त्यांनी फडणवीसांना सणसणीत टोला लगावला आहे. 

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय  होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या 'प्रेस बाईट'चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात 'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं" असं म्हणत रोहित यांनी निशाणा साधला आहे. 

एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलू लागते, म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे. हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे. हा सगळा प्रकार आणि गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता मार्क ट्वेनच्या 'सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं', या वाक्याची प्रचिती येते आणि हा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न असल्याचा दाट संशय येतो" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post