पुढच्या काळात भाजपच सगळीकडे सत्तेत असेल, तुम्ही लवकर नंबर लावा

 नगरसेवक सुभाष लोंढे यांना माजी मंत्री कर्डिले यांची खुली ऑफर

पुढच्या काळात भाजपच सगळीकडे सत्तेत असेल, तुम्ही लवकर नंबर लावानगर : नगरमधील लोंढे परिवाराच्यावतीने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांच्यासह पद्मश्री पोपटराव पवार, स्थायी समितीचे नूतन सभापती अविनाश घुले, सरपंच बाळासाहेब आरडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, बलभिम शेळके, अक्षय कर्डिले, अरुण होळकर, संजय गिरवले, नगरसेवक सुभाष लोढे, संभाजी लोढे, राजू शिंदे, भाऊसाहेब दातरंगे, मनोज लोढे, बाळासाहेब कर्डिले, जालिदंर चत्तर, गोरख खंडागळे, शाम लोढे, सुनिल कदम, दत्ता तापकिरे आदी उपस्थित होते.

यावेळी भाषण करताना माजी मंत्री कर्डिले यांनी जोरदार फटकेबाजी केली. नगर मनपात स्थायी समितीत शिवसेनेला घ्यावी लागलेली माघार व एकूणच शहरात शिवसेनेची कमजोर बनलेली राजकीय स्थिती यावर भाष्य करीत कर्डिले यांनी नगरसेवक सुभाष लोंढे यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. कर्डिले म्हणाले की, सुभाष लोंढे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असला तरी नगरमध्ये या पक्षाचे काय चालले हे महानगरपालिका स्थायी समितीच्या निवडणुकीत दिसून आले आहे. त्यांच्या पक्षाचे तीन नगरसेवक गायब होते. त्यामुळे नामुष्की पदरात पडू नये म्हणून माघार घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे सांगण्याची वेळ आली. राज्यातील महाविकास आघाडीचा खेळही फार काळ चालणार नाही. पुढच्या काळात राज्यात तसेच नगर महापालिकेतही भाजपचीच सत्ता येणार हे निश्चित असून सुभाष लोंढे यांनी आताच प्रवेशाबाबत निर्णय घ्यावा. पुढे कदाचित आम्ही भरती बंद केली तर प्रवेशावेळी अडचणही येवू शकते अशी मिश्किल टिप्पणीही कर्डिले यांनी केली. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post