आरोग्यसेवक आणि वाहनचालक संवर्गाच्या परिक्षेचा निकाल राखून ठेवण्यात येणार

पोलिसांची चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोग्य सेवक आणि वाहन चालक संवर्गाच्या परिक्षेचा निकाल राखून ठेवण्यात येणार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट 'क' च्या पदभरतीसाठी एकूण ५४ संवर्गांसाठी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील ३२ जिल्ह्यांत ८२९ केंद्रावर परीक्षा पार पडली. एकूण १ लाख ३३ हजार परिक्षार्थींनी परीक्षा दिली. या परिक्षेदरम्यान गैरप्रकार झाला असल्याचा विषय विरोधकांनी नियम ९७ अन्वये चर्चेस आणला होता. या चर्चेला सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी सविस्तर उत्तर दिले. ५४ संवर्गांपैकी ठाण्यातील सुतार संवर्गासाठी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. तर आरोग्य सेवक आणि वाहन चालक संवर्गाच्या परिक्षेचा निकाल पोलिसांची चौकशी पूर्ण होईपर्यंत राखून ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त इतर संवर्गांच्या परिक्षेत कोणताही गोंधळ झाला नसून पुन्हा परीक्षा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राजेश टोपे यांनी सांगितले की, काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका उशिरा पोहचल्या आणि उशीरा उघडलेल्या केंद्रांवर उमेदवारांना तेवढा वेळ वाढवून दिला होता. या परिक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची कुठलीही तक्रार आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच कंपनीबाबत पूर्ण पडताळणी केल्यानंतरच परीक्षा घेण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. तसेच परीक्षा घेण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर कंपनीकडून केला गेला होता. त्यामुळे विरोधकांनी कंपनीबाबत उपस्थित केलेले प्रश्न योग्य नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post