ग्रामविकास विभागाचे गुणवंत अधिकारी,कर्मचारी पुरस्कार जाहीर, नगर जिल्ह्यातून ‘हे’ ठरले मानकरी

 ग्रामविकास विभागाचे गुणवंत अधिकारी,कर्मचारी पुरस्कार जाहीर

ग्रामविकास अधिकारी  एकनाथ ढाकणे यांना पुरस्कार
नगर (सचिन कलमदाणे): राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने क्षेत्रीय स्तरावरील तसेच मंत्रालय स्तरावरील गुणवंत अधिकारी, कर्मचार्‍यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. सन 2019-20 या वर्षाकरिता एकूण 43 गुणवंत अधिकारी, कर्मचार्‍यांची निवड झाली आहे. यात नगर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र विकास सेवा गट अ व गट ब अधिकारी संवर्गात राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शंकरराव शेवाळे हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 

नाशिक विभागाअंतर्गत अकोले तालुक्यात कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय अहमदनगर जिल्हा परिषदेतील सहायक लेखाधिकारी प्रदीप काशिनाथ वर्पे यांनाही गुणवंत पुरस्कार जाहीर झाला आहे.

मंत्रालय स्तरावर कक्ष अधिकारी सं.ना.भंडारकर, शं.शा.यादव, सहाय्यक कक्ष अधिकारी स.म.सावंत, श्रीमती अ.दि.धोंडे, लिपिक मं.य.कुर्‍हाडे, वाहनचालक अमीन इनामदार तर शिपाई संवर्गातील वि.वा.गोडकर, चं.सि.चिपळूणकर, ल.मो.साळसकर, ज.वि.मोरे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

नगर जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे हे राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष म्हणून संघटनात्मक पातळीवरही योगदान देत आहेत. ढाकणे कार्यरत असलेल्या गणोरे ग्रामपंचायतीस नुकताच स्व.आर.आर.आबा पाटील सुंदर गाव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल ढाकणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post