सहा महिन्यांपूर्वी झाले होते बेपत्ता, नदीपात्रात मिळाला सांगाडा...

 सहा महिन्यांपूर्वी झाले होते बेपत्ता, नदीपात्रात मिळाला सांगाडा...शेवगाव: सुमारे सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता म्हणून पोलिसांत नोंद झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाचा सांगाडा शेवगाव तालुक्यातील आखातवाडे येथील ढोरा नदीच्या पुलाखाली सापडला आहे. बाळासाहेब शाहू कटारनवरे (वय 45, रा. आपेगाव) यांचा हा सांगाडा असल्याचे कपड्यांवरून निष्पन्न झाले. याबाबत नातेवाईकांनी सहा महिन्यांपूर्वीच बाळासाहेब बेपत्ता झाल्याची तक्रार शेवगाव पोलिस ठाण्यात दिली होती. हा सांगाडा न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. आपेगाव येथून घरी काहीही न सांगता, 13 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी बाळासाहेब कटारनवरे निघून गेल्याची तक्रार त्यांचा मुलगा अजय कटारनवरे याने शेवगाव पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, सहा महिन्यांपासून त्यांचा तपास लागला नव्हता. ढोरा नदीतील बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने, पात्रात बरेच दिवस पाणी होते. आता पाणी कमी झाल्यावर आखातवाडे येथील पुलाखालील मोर्‍यामध्ये काही नागरिकांना काटवनात मानवी सांगाडा दिसला. सेवा संस्थेचे अध्यक्ष रघुवीर उगले यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे कवटी व हाडाचा सापळा दिसला. त्यावर पांढरा शर्ट, निळसर पँट पाहून कटारनवरे यांच्या कुटुंबीयांना ओळख पटली. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post