आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत तोतया परीक्षार्थी, तिघांवर गुन्हा दाखल

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत तोतया परीक्षार्थी, तिघांवर गुन्हा दाखल नगर : आरोग्य विभागाच्या वर्ग "क'च्या निवड परीक्षेसाठी बसलेल्या तोतया (डमी) परीक्षार्थींना रंगेहाथ पकडण्यात आले. तोतया, मूळ परीक्षार्थी व त्याला मदत करणारा, अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली असून, हे तिघे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. आरोग्य विभागाच्या वर्ग "क' पदासाठी जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीला लेखी परीक्षेचे काम दिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात  एकाच दिवशी ही परीक्षा झाली.  पेमराज सारडा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर 360 परीक्षार्थी होते. परीक्षा सुरू झाल्यानंतर ब्लॉक नंबर 3मधील परीक्षार्थी केसरसिंग स्वरुपचंद सिंगल (वय 22, रा. गोकुळवाडी, जि. जालना) याच्याकडे मोबाईल सापडला. पर्यवेक्षक नवनाथ भोंदे यांनी त्यास पकडले. परीक्षा नियंत्रक कक्षाचे समन्वयक रितेश गायकवाड यांनी सिंगल याचे हॉल तिकिट तपासले असता, कृष्णधवल फोटोवर दुसरा रंगीत फोटो लावलेला होता. हा फोटो व प्रत्यक्ष परीक्षार्थी वेगवेगळे असल्याचे आढळून आले. याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता, प्रश्‍नपत्रिकेचे 25 फोटो त्यात आढळून आले तोफखाना पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याचे खरे नाव संदीप साहेबसिंग बिघोत (वय 25, रा. जवखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असल्याचे समजले. त्याला डमी परीक्षार्थी म्हणून बसविण्यासाठी धरमसिंग प्रेमसिंग सनवन (वय 38, रा. गोकुळवाडी, जि.जालना) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post