नगर तालुक्यातील 'या' सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

 सारोळा कासार, बाबुर्डी बेंद सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ५ मार्च पर्यंत मुदत; ३ व ४ एप्रिलला होणार मतदान 


 

नगर - महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर दि. ३१ मार्च पर्यंत थांबविलेल्या आहेत. तथापि उच्च / सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केलेल्या संस्था या आदेशातून वगळलेल्या आहेत. त्यामुळे नगर तालुक्यातील सारोळा कासार व बाबुर्डी बेंद या २ सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी जाहीर केला आहे.

या दोन्ही सोसायट्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार (दि.१) पासून सुरु झाली असून ५ मार्च पर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दाखल अर्जांची छाननी दि. ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणेसाठी  दि. ९ ते २३ मार्च पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे.

सारोळा कासार सोसायटीसाठी ३ एप्रिल रोजी तर बाबुर्डी बेंद सोसायटीसाठी दि.४ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी मतदान संपल्यानंतर लगेच सुरु होणार असून ती संपल्यावर निकाल घोषित केला जाणार आहे. 

नगर तालुक्यातील २ सोसायट्यांबरोबरच श्रीगोंदे तालुक्यातील सुरेगाव आणि घोटवी सोसायटीची निवडणूक प्रक्रियाही सुरु झाली आहे. सुरेगाव साठी २ एप्रिलला तर घोटवी साठी ४ एप्रिलला मतदान होणार आहे.

वाढीव ३६२ व्यक्तींना मतदानाचा हक्क देण्याची याचिका फेटाळली 

नगर तालुक्यातील सारोळा कासार सोसायटीच्या ९३१ मतदारांची अंतिम मतदार यादी १६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत आणखी ३६२ व्यक्तींना सहभागी करून घेत त्यांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी रवींद्र कडूस आणि इतर दोघांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकेद्वारे केली होती. 

या याचिकेवर सोमवारी (दि.१) दुपारच्या सत्रात सुनावणी झाली. यावेळी संस्थेच्या वतीने अॅड. नितीन गवारे पाटील यांनी बाजू मांडताना संबंधितांनी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यावर हरकती साठी अवधी दिलेला असताना कोणीही हरकत घेतली नाही. तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी त्या सभासदाची मागणी हवी, कोणीही सामूहिकरीत्या अशी मागणी करू शकत नाही. 

या शिवाय याचिकेत नमूद व्यक्ती संस्थेच्या सभासद असल्याबाबत संस्थेकडे कुठलेही पुरावे आढळून येत नाहीत. आता निवडणूक जाहीर झालेली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु झालेली आहे. त्यामुळे सदर याचिकेद्वारे केलेली मागणी कायद्याला धरून नाही असा युक्तिवाद केला तो ग्राह्य धरून खंडपीठाने रवींद्र कडूस आणि इतर दोघांची याचिका फेटाळून लावली असल्याचे अॅड. नितीन गवारे पाटील यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post