फडणवीसांच्या दिल्लीवारीनंतर 'पत्र' प्रकरण

 फडणवीसांच्या दिल्लीवारीनंतर 'पत्र' प्रकरण, देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा करून निर्णय - शरद पवार
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेले. त्यानंतर लेटरबॉम्बचे सर्व प्रकरण घडले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. या सगळ्याचा परमबीर सिंह यांच्या दिल्लीवारीशी काही संबंध आहे का, हे मला माहिती नाही. माझ्याकडे तसे पुरावे नाहीत. केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणे हा परमबीर सिंह यांचा अधिकार आहे. त्याबाबत माझा काहीही आक्षेप नाही. मात्र, सर्व घडामोडी फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्या दिल्लीवारीनंतरच घडायला लागल्या, ही गोष्ट शरद पवार यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. 

परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे विरोधकांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकारपरिषदेत काही मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असे स्पष्ट केले.

अनिल देशमुख यांचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल. याबाबत सर्वांशी बोलून निर्णय घेऊ, गृहमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग हे मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी अन्याय होत आहे, असे त्यांनी सांगितले होते, असेही पवार म्हणाले.

राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असून यामध्ये कुणालाही यश येणार नाही असंही शरद पवार म्हणाले. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post