मोठी बातमी...पोलीस-नक्षल चकमकीत पाच नक्षलवादी ठार

पोलीस-नक्षल चकमकीत पाच नक्षलवादी ठार
 मुंबई, दि. 30 : उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीत गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ जहाल नेत्यासह पाच नक्षलवादी ठार झाले. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवानांचे विशेष अभिनंदन केले.

या भागात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या आधारे गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. त्यांचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी हे नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.


मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांनी नक्षलविरोधी अभियानाची आखणी केली. त्यानुसार श्री.कलवानिया यांच्या नेतृत्वाखाली मौजा खोब्रामेंढा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 च्या जवानांनी नक्षलविरोधी कारवाई सुरु केली. त्यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या 40 ते 50 नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढविला. सी-60 जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले असताना घटनास्थळी 3 पुरुष नक्षलवादी व 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले असून मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.

43 लाख रुपयांचे बक्षीस

यात मृतक नक्षलवाद्यांवर जवळपास 43 लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत सदर घटनास्थळी एक एके-47 रायफल, एक 12 बोअर रायफल, एक 303 रायफल, एक 8 एमएम रायफल तसेच मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post