मागच्या दाराने विधानभवनात जाणार नाही, राहुरीतूनच पुन्हा निवडणूक लढवणार : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

 


मागच्या दाराने विधानभवनात जाणार नाही, राहुरीतूनच पुन्हा निवडणूक लढवणार : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेनगर : विधानभवनात मागच्या दाराने प्रवेश करणार नाही. राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढविणार आहे. खासदार डॉ. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नातेवाईक व कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची गरज आहे. माझ्याशी कोणाचे पटत नसेल, याचा अर्थ विरोधात जाणे योग्य नाही. हा प्रश्न फक्त राहुरीचा नसून, सर्व जिल्ह्याचा आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून तनपुरे साखर कारखाना सुरळीत चालविण्यासाठी मदत केली. यापुढेही करू,अशी स्पष्ट भूमिका माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मांडली. जिल्हा बँकेच्या संचालकपदी विजयी झाल्याबद्दल कर्डिले यांचा राहुरीत सत्कार करण्यात आला. यावेळी खा.डॉ.सुजय विखे म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेची नगर तालुक्यात निवडणूक झाल्याने माजी आमदार शिवाजी कर्डिले हिरो ठरले आहेत. राहुरीतील मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगळा कौल दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होणे स्वाभाविक आहे; परंतु विखे-कर्डिले भविष्यात एकसंघ राहतील. ज्यांना तनपुरे यांच्या वाड्यावर जायचे, त्यांनी खुशाल जावे. आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीर आहोत. ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकर्‍यांच्या विजेच्या प्रश्नाबाबत गंभीर तक्रारी आहेत, अशी टिकाही त्यांनी केली. कार्यक्रमास रावसाहेब तनपुरे,  नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, उत्तम म्हसे, सुरेश बानकर, विक्रम तांबे, किशोर वने, नानासाहेब गागरे, संचालक रवींद्र म्हसे, सुरसिंग पवार, अर्जुन बाचकर आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post