जंतनाशक गोळी खाल्ल्यानंतर चिमुरडीचा अकस्मात मृत्यू, सखोल चौकशीची मागणी... Video

 जंतनाशक गोळी खाल्ल्यानंतर चिमुरडीचा अकस्मात मृत्यू,  सखोल चौकशीची मागणी 
नगर -आरोग्य विभागामार्फत सध्या जंत नाशक गोळ्या वाटपाची मोहीम सुरू आहे.  जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा अकस्मात मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रांजल अंकुश रक्ताटे (वय १ वर्षे १० महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मीर या गावात ही घटना घडली. या चिमुरडीची उत्तरीय तपासणी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उशिरापर्यंत सुरू होती. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होईल. प्रांजलचे काका भाऊसाहेब रक्ताटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ”लोणी सय्यद मीर या गावात जिल्हा आरोग्य यंत्रणेचे उपकेंद्र आहे. ते बंद असल्याने जंतनाशक गोळ्या गावातील मारूती मंदिरात आशासेविकांच्या माध्यमातून वाटण्यात आल्या. मुलांच्या पालकांच्या हाती गोळ्या देऊन घरी गेल्यावर मुलांना द्या, असे सांगण्यात आले. गोळ्या घरी घेऊन आल्यावर प्रांजल हिला पूर्ण गोळीतील अर्धी गोळी दिली. तिला गोळी दिल्यानंतर ती जमिनीवर कोसळली. तिने अंग सोडून दिले. त्यानंतर तिला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तिथे उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. गोळीमधील उर्वरीत गोळी तशीच आहे”. परिसरात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान खुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विनोद जोगदंड म्हणाले, ”जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम एक मार्चपासून सुरू आहे. गावात अशाप्रकारे कोणालाही त्रास झालेला नाही. गावात राहिलेल्या मुलांसाठी आज गोळ्यांचे वितरण केले. या प्रकारची माहिती वरिष्ठांना दिली आहे”. 

Video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post