ग्रामसेवकांस मारहाण करुन खोटा गुन्हा, ग्रामसेवक संघाचे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन

 ग्रामसेवकांस मारहाण करुन खोटा गुन्हा दाखल केल्याबाबत ग्रामसेवक संघाचे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची पोलिस अधिक्षकांबरोबर चर्चा
     नगर - नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी रमेश गायके यांना मारहाण करुन त्यांच्यावर खोटी फिर्याद दाखल केल्याच्या निषेधार्थ जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्यावतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत, तांत्रिक ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सौदागर, ग्रामसेवक पतसंस्थेचे माजी चेअरमन किशोर जेजुरकर, नगर तालुकाध्यक्ष अशोक जगदाळे, सुहास शिरसाठ आदिंसह ग्रामसेवक उपस्थित होते.

     मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रमेश गायके ग्रामपंचायत कार्यालयात जात असतांना शेवगांव येथील एका महिलेने शिवीगाळ दमदाटी करुन गंचाडी धरुन चप्पलने मारहाण करुन जखमी करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. सदर घटनेची चौकशी केली असता सदर महिला ही गावातील नसून शेवगाव येथील रहिवासी आहे व या महिलेचा मौजे कुकाणा या गावात ग्रामसेवक व ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून, सदर घटना घडल्यानंतर महिलेवर सरकारी कामात अडथळा व इतर प्रक़ारचा गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित महिलेने ग्रामसेवकांवर खोटा गुन्हा दाखल केला असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

     सदर महिलेला या ग्रामसेवकास मारहाण करणे, शिवीगाळ करुन दमदाटी करणे व चप्पलने मारहाण करुन ग्रामसेवकांवर खोटा गुन्हा दाखल करण्याबाबत कोण खतपाणी घालत आहे का? याचा योग्य तो तपास करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

     याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क करुन सदर महिलेने दाखल केलेला खोट्या गुन्ह्याची पडताळणी करुन हे खोटे कारस्थान कोणी व का घडवून आणले याची चौकशी करुन तपास करावा याबाबत चर्चा केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post