अनिलभैय्या, नगरकरांच्या हृदयावरील तुमचे अधिराज्य कालही होते, आजही आहे व उद्याही राहिल...

 अनिलभैय्या, नगरकरांच्या हृदयावरील तुमचे अधिराज्य कालही होते, आजही आहे व उद्याही राहिल...
शिवसेनेचे उपनेते स्व.अनिलभैया राठोड यांची आज जयंती. भैया आपल्या सर्वांना कायमचा जय महाराष्ट्र करून निघून गेले. पण भैया आपल्यात नाहीत, यावर आजही विश्वास वाटत नाही. आजही शिवालयात गेल्यावर भैयांचे अस्तित्त्व पदोपदी जाणवतं. त्यांच्या नसण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटते. वाघासारखे जगणे म्हणजे काय असते हे त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यावर कळते. नगर शहरासाठी अनिलभैय्या म्हणजे एक झंझावात होते, भगवे वादळ होते. राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, धर्माभिमान, सर्वसामान्यांप्रती बांधिलकी काय असते हे आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना त्यांच्याकडूनच शिकायला मिळायचे. सर्वसामान्य नगरकरांसाठी ते हक्काचा आधार होते. कोणतीही अडचण असू द्या, आपल्यासाठी अनिलभैय्या धावून येतील, असा विश्वास सर्वसामान्य नगरकरांना असायचा. 

हिंदूधर्मरक्षक स्व.अनिलभैय्या राठोड यांनी खर्‍या अर्थाने नगरकरांच्या, असंख्य शिवसैनिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. आमच्या सर्वांच्या हृदयातील त्यांचे अढळ स्थान कालही होते, आजही आहे व उद्याही राहिल. मला स्वत:ला अनिलभैयांचा सहवास तसा अल्पकाळच लाभला. पण या काळात त्यांच्याकडून मिळालेली समाजाप्रती बांधिलकी जपण्याची शिकवण लाखमोलाची आहे. तुम्ही सार्वजनिक जीवनात काम करता तेव्हा तुमची शंभर टक्के बांधिलकी ही जनतेशी असली पाहिजे. त्यासाठी कधी संघर्ष करायची वेळ आली तर मागे हटायचे नाही. सर्वसामान्यांचे आशिर्वाद तुम्हाला या संघर्षात नक्की यश मिळवून देतील, अशी शिकवण ते कायम द्यायचे.नगरकरांनी मोठ्या विश्वासाने त्यांना सलग पाच वेळा आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले. इतके प्रचंड प्रेम त्यांना नगरकरांनी दिले. आमच्यासारख्या युवकांसाठी ते राजकारण, समाजकारणातील रोल मॉडेल होते व पुढेही राहतील. आज त्यांनीच घालून दिलेल्या मार्गावर नगरमधील शिवसैनिक वाटचाल करीत आहे. नगरमधील चुकीच्या प्रवृत्तींविरोधात त्यांनी शेवटपर्यंत कडवा लढा दिला. अनेकांना त्या प्रवृत्तींविरोधात संघर्ष करायला, आत्मसन्मानाने उभे रहायला शिकवले. तोच वारसा आम्ही पुढे नेत राहू. अनिलभैय्या नसले तरी त्यांनी घडवलेले शिवसैनिक व त्यांनी उभी केलेली शिवसेना आपल्या बरोबर आहे हा विश्वास नगरकरांना आहे. तोच विश्वास कायम राखण्याचा आमचा प्रयत्न राहिल. स्व.अनिलभैय्या राठोड यांना जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रध्दांजली!

-अभिषेक कळमकर

माजी महापौर, नगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post