...तर लवकरच जिल्हा बँकेचे दिवाळे निघेल

नियमबाह्य कर्जवाटपाची चौकशी करावी - तुकाराम दरेकरनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेकडून कॅपिटल फंडाच्या ५० टक्क्यांहून अधिक कर्ज साखर कारखान्यांना वाटप करण्यात आले असून, या नियमबाह्य कर्जवाटपाची चौकशी करावी, अशी मागणी श्रीगोंदा विकास आघाडीचे तुकाराम दरेकर यांनी नाबार्डकडे केली आहे.

जिल्हा बँकेला साखर कारखान्याला सेक्टरल मर्यादा पाळून बँकेच्या कॅपिटल फंडाच्या जास्तीतजास्त ५० टक्के इतके कर्ज वितरित करता येते. प्रत्यक्षात जिल्हा बँकेने आतापर्यंत कॅपिटल फंडाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज दिले आहे.

नाबार्डचे नियम डावलून कारखान्यांना आत्तापर्यंत एवढे जास्त कर्ज दिले गेले आहे की, येथून पुढे या कारखान्यांना नवीन कर्ज देताच येणार नाही. कारखान्याला कर्ज मिळवे, यासाठी अनेक साखर सम्राट जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात निवडून जाण्यासाठी वर्षानुवर्षे धडपड करीत आले आहेत. या पद्धतीने बँक चालविली, तर लवकरच जिल्हा बँकेचे दिवाळे निघेल.

अहमदनगर जिल्हा बँकेने गेल्या दोन महिन्यांत संकरित गाईंसाठी सुमारे ३५० कोटींचे खेळते भांडवल वितरित केले. हे कर्ज भरण्याची मुदत दि. ३१ मार्च, २०२१ पर्यंत आहे. या कर्जाचे नूतनीकरण न झाल्यास बहुतेक शेतकऱ्यांना हे कर्ज फेडता येणार नाही. ज्यांच्याकडे अजिबात गाई नाहीत, त्यांना दिलेले हे कर्ज अनुत्पादक कर्ज आहे. हे कर्ज थकबाकीत जाण्याचा धोका आहे. संस्था पातळीवर वि. का. सोसायट्या सुमारे ७० टक्के कर्जदारांचा शंभर टक्के वसूल करते, परंतु राहिलेले ३० टक्के कर्जदार थकीत असतात. अशा वेळी जिल्हा बँक वि.का. सोसायट्यांकडून आलेल्या भरण्यामध्ये अगोदर १०० टक्के व्याजाची वसुली दाखविते. त्यामुळे सोसायट्यांकडे मुद्दल येणे दिसते आणि त्यावर बँकेचे व्याजाचे मीटर चालू राहते. बँकेचा हा कारभार सोसायट्यांच्या अजिबात हिताचा नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post