दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन कि ऑनलाईन? बोर्डाकडून आला खुलासा...


दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन कि ऑनलाईन? बोर्डाकडून आला खुलासा... पुणे :  राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार की ऑफलाइनच होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, परीक्षेला अद्याप दोन महिने असून, परिस्थितीनुसार परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण राज्य मंडळाने दिले आहे.

राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल आणि मेमध्ये घेतल्या जाणार आहेत. परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने काही जिल्ह्य़ांतील शाळा-महाविद्यालये काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार याची चर्चा विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये सुरू झाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असल्याने ऑनलाइन परीक्षा सोयीस्कर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेलाच परीक्षा केंद्र घोषित करता येऊ शकते, जेणेकरून विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी प्रवास करावा लागणार नाही, असा एक पर्याय मांडला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post