शेतकऱ्याने केली चक्क अफूची शेती, १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

 जातेगाव येथे अफूची शेती,५६ किलो अफूचे झाडे पोलीसांनी केले जप्त 

        जामखेड(नासीर पठाण) - तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केली असून ती मोठी झाली आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पथकासह छापा टाकला असता १ लाख ७० हजार रुपयांची ५६ किलो वजनाची अफूची झाडे पोलीसांनी जप्त केले व आरोपी विरूद्ध  गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 

            याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार दि.२५ रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमी दाराकडुन माहिती मिळाली की तालुक्यातील जातेगाव येथे आरोपीचे वासुदेव महादेव काळे (वय ३९ रा. जातेगाव) याने स्वतःचे मालकीचे गट नंबर १०७७ मध्ये अफूची लागवड केली आहे. या माहितीवरून तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक फौजदार विठ्ठल गायकवाड, संजय लाटे, संदीप आजबे, संग्राम जाधव, विजयकुमार कोळी, अविनाश ढेरे, आबासाहेब आवारे, संदीप राऊत, सचिन पिरगळ, हनुमान आरसुळ यांचे पथक जातेगाव येथे गुरुवरी रात्री आठ वाजता दाखल झाले. 

             सदर पथकाने आरोपी वासुदेव काळे यांच्या शेतात छापा टाकला असता त्यामध्ये १ लाख ६९ हजार ८१५ रुपये किंमतीची ५६ किलो ग्रॅम वजनाचे अफूचे झाडे आढळून आली. पोलिसांनी त्याचा पंचनामा करून आरोपीला अटक केली. याबाबत जामखेड पोलीसात संजय लाटे यांनी फिर्याद दिली आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post