संस्कार आणि शिक्षण हेच जीवनाच्या यशाचे खरे गमक -श्री एस.बी.शिंदे

 संस्कार आणि शिक्षण हेच जीवनाच्या यशाचे खरे गमक -श्री एस.बी.शिंदे


अमृत महोत्सव कार्यक्रम

सोनगाव - संस्कार ,शिक्षण आणि शिस्त हे जीवनाच्या यशाचे सूत्र असून  वडिलांची असलेली कडक शिस्त ,नियम यामुळे मी जीवनात यशस्वी झालो .आईच्या संस्कारामुळे मला जीवनाची दिशा मिळाली. त्यामुळेच मी आज 75 व्या वाढदिवसाच्या निमित्त अतिशय सुखी आणि समाधानी आहे, असे प्रतिपादन राहुरी येथील विद्या मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री एस. बी. शिंदे सर यांनी केले. श्री शिंदे सर यांचा 75 वा वाढदिवस अमृत महोत्सव सोहळा नुकताच सोनगाव अनापवाडी येथे संपन्न झाला. सरांच्या मुली व पुतणे यांनी सरांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, या अमृत महोत्सवाचे आयोजन केले आणि त्यांना सरप्राईज गिफ्ट दिले.या कार्यक्रमासाठी सरांचे नातेवाईक, वर्गमित्र ,स्नेही आवर्जून उपस्थित होते. 

शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री साहेबराव अनाप यावेळी बोलताना म्हणाले, श्री शिंदे सर आमच्या नात्यातील सर्वात अगोदर शिकलेले व्यक्तिमत्व. त्यांचा सुशील आणि सुसंस्कृत स्वभाव व सदोदित मार्गदर्शन यामुळे त्यांचा आम्हाला नेहमीच आदर वाटतो. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले. याबरोबरच गावातील व नात्यातील तरुणांनाही त्यांनी योग्य दिशा दिली. त्यांचे जीवन चरित्र हे आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहे.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती श्री संपतराव सिनारे, श्री सोपानराव  पाराजी दिघे ( माजी संचालक प्रवरा सहकारी साखर कारखाना प्रवरानगर), नारायण अनाप, दत्तात्रय अनाप, सखाराम अंत्रे,लक्ष्मणराव अंत्रे,  चंद्रभान अंत्रे ,राजेंद्र अनाप,  शामराव अंत्रे,श्रीपतराव शिंदे, सुरेश शिंदे, दशरथ शिंदे, विजय शिंदे, शहाजी शिंदे , मुकेश माळी आदी उपस्थित होते .यावेळी संपतराव सिनारे,लक्ष्मण अंत्रे, हरकूदास अंत्रे, आदींनी आपली मनोगतं व्यक्त केलीत. याप्रसंगी सरांच्या कन्या सौ. कविता रासकर यांनी आई-वडिलांमुळेच आम्हाला जगण्याची दिशा मिळाली. त्यांचे संस्कार, त्यांची शिस्त ही आमच्या यशस्वी जीवनाला कारणीभूत ठरली ,असे सांगून सर्व उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी श्री शिंदे सरांनी कृष्णाजी बाबा देवस्थान च्या वाचनालयासाठी व भगिनी निवेदिता वाचनालयासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची देणगी दिली.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री साहेबराव अनाप गुरुजी यांनी केले तर आभार श्री हरकुदास अंत्रे यांनी मानले.ग्रामीण भागात एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांना उपस्थितांनी धन्यवाद दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post