राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते र. ग. कर्णिक यांचे निधन
मुंबई: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस व लोकप्रिय कामगार नेते रमाकांत गणेश उर्फ र. ग. कर्णिक यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. कर्णिक यांच्या निधनामुळं आधारवड हरपल्याची भावना कामगार क्षेत्रात व्यक्त होत आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. कर्णिक यांनी तब्बल ५२ वर्षे १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजपर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांची राजवट त्यांनी जवळून पाहिली होती. कामगारांचा आवाज बनून त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांशी वाटाघाटी केल्या होत्या. १९७० व १९७७ मध्ये कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कर्मचाऱ्यांचे दोन मोठे संप झाले होते. कामगारांच्या रास्त प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करायचा पण तुटेपर्यंत ताणायचे नाही, अशी त्यांची कामाची पद्धत होती. त्यामुळंच त्यांच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले.
Post a Comment