प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी, लग्न समारंभात जादा गर्दी झाल्यास गुन्हे नोंदवणार

जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी, लग्न समारंभात जादा गर्दी झाल्यास गुन्हे नोंदवणारनगर : राज्यातील अनेक भागात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.‌नगर जिल्ह्यातही रूग्णसंख्या वाढु लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.  कोविड केअर सेंटरसह सर्व वैद्यकीय सुविधा पुन्हा सज्ज करण्याचा आदेशही देण्यात आले आहे.

त्यानुसार सर्व विभागांना आणि अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोनाचा प्रभाव ओसरला म्हणून बंद करण्यात आलेली कोविड केअर सेंटर, विलगीकरण केंद्र आणि अन्य सुविधा पुन्हा अद्ययावत करण्याचा आदेश देण्यात आला आहे, कोणत्याही क्षणी आलेल्या रुग्णांसाठी ही यंत्रणा सज्ज होईल, अशी व्यवस्था करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पूर्वी करोना रुग्ण आढळून आला की त्याच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची चाचणी घेतली जात होती. ती पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. एखाद्या परिसरात जास्त संख्येने रुग्ण आढळून आल्यास तेथे प्रतिबंधित क्षेत्र (कंटन्मेंट झोन) करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. 

लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांमुळे करोनाचा प्रसार वाढत असल्याचे आढळून आल्याने त्यावरील बंधने पुन्हा कडक करण्यात आली आहेत. लग्नासाठी परवानगी घेणे आणि पन्नास जणांचीच उपस्थिती असणे आवश्यक करण्यात आले आहे. अन्यथा गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शाळा, महाविद्यालये, खासगी क्लास येथेही उपाययोजना केल्या जातात की नाही, यावर लक्ष ठेवण्याचा आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आला आहे. हॉटल पन्नास टक्के क्षमतेनेच सुरू ठेवता येणार आहेत. बस, रेल्वे आणि अन्य वाहनांत परवानगीपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक होणार नाही, यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाईचा आदेशही देण्यात आला आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस आणि महापालिकेची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पूर्वी जशी दक्षता आणि कारवाई केली जात होती, तशीच ती कडक करण्यात येणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post