उपेक्षित वर्गातील मुलांच्या शिक्षणाबाबत सीईओंनी संवेदनशीलता दाखवावी
जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे यांची मागणी
चरितार्थासाठी कायमच शैक्षणिक उपेक्षा असणा-या ऊसतोड कामगार,वीटभट्टी मजूर,दगडखाणीवर काम करणा-या मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणखात्याने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.शैक्षणिक बाबतीत कायमच उपेक्षा होणा-या या विद्यार्थ्यांची प्राधान्याने काळजी करावी असा पत्रव्यवहार जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना करुन शैक्षणिक सजगता दाखविण्याचे आवाहन केले आहे.
दरवर्षी दिवाळीनंतर हा मजूरवर्ग आपल्या कामावर हजर होतो.अहमदनगर जिल्ह्यात ही संख्या मोठी आहे.करोना कालावधीत शाळा बंद असल्याने आपल्या पाल्यांसहित हे मजूर कामावर हजर आहेत.ऑनलाइन शिक्षण सुरु असले तरी अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होते.शाळा बंद असल्याने त्यांचा शालेय पोषण आहारही बंदच आहे.
हे मजूर ज्या विभागात आले आहेत त्या परिसरातील शाळा शिक्षकांकडून तातडीने या विद्यार्थ्यांच्या सर्व्हेक्षणाची गरज आहे.या विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेतील शिक्षकांनी दररोज किमान तीन तास जरी ऑफलाईन अध्यापन केले तरी त्यांचे शैक्षणिक कालावधीत ही जमेची बाजू ठरेल.
करोना कालावधीत नियमांचे पालन होण्यासाठी साखर कारखाना प्रशासन,वीटभट्टी मालक आणि खाणमालक यांनी त्यांना सँनिटायझर,मास्क,शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिल्यास शैक्षणिक कामास हातभार दिल्याचा आनंदही त्यांना मिळेल.यातून शिक्षकांचीही काळजी घेतली जाईल.
शिक्षण विभागाकडे पाठ्यपुस्तके उपलब्ध असतील तर या विद्यार्थ्यांना देण्यात यावीत.शाळा सुरु असताना या विद्यार्थ्यांना लगतच्या शाळेत बसवून पोषण आहार दिला जातो.आज शाळा बंद असल्याने पालकांना तांदूळ व डाळ दिली जाते.उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी लगतच्या शाळांनी पुढील महिन्याची मागणी दाखवून या विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळी दिल्यास त्यांचे पोषण आहाराचाही प्रश्न सुटेल.
शिक्षण खात्याकडून याबाबद अधिक काळजीपुर्वक वर्तनाची अपेक्षा आहे.उपेक्षित वर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नसावा त्यांनाही योग्य शैक्षणिक न्याय मिळावा अशी अपेक्षाही शेवटी जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
Post a Comment