सरपंच आरक्षणाची अशीही गंमत....ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून सेवा देणारा होणार सरपंच
संगमनेर - तालुक्यात तीन पिढ्या ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून राबणाऱ्या कुटुंबाला आरक्षणामुळे सरपंचपदाची संधी चालून आली आहे. संगमनेर तालुक्यातील मनोली या छोट्या गावात सेवानिवृत्त शिपाई अशोक पराड यांना सरपंचपदाची संधी मिळत आहे. त्यांचा मुलगा तेथे शिपाई म्हणून नोकरीला असल्याने वडील सरपंच आणि मुलगा शिपाई असे चित्रही पहायला मिळणार आहे. यावेळी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ११ पैकी ९ जागा जिंकत विखे यांच्या जनसेवा मंडळाने सत्ता मिळविली आहे. आता सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार या गावाचे सरपंचपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव झाले. या प्रवर्गातील एकमेव उमेदवार अशोक पराड हे असल्याने या पदावर त्यांचीच वर्णी लागणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या तीन पिढ्या ग्रामपंचायतीच्या सेवेत आहेत. अल्पभूधारक असलेले पराड यांची उपजिविका शेती आणि ग्रामपंचायतीच्या नोकरीवर चालते. त्यांच्या कुटुंबातील भागाजी पराड हे मनोली ग्रामपंचायतीत स्थापनेपासून शिपाई म्हणून नोकरीला होते. १९८७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर दहावी शिकलेला त्यांचा मुलगा अशोक त्यांच्या जागेवर शिपाई म्हणून रूजू झाला. पुढे बढती मिळून लेखनिक झाला. तब्बल २७ वर्षे नोकरी करून अशोक सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सुमारे सात वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा शैलेश त्याच ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला लागला. अद्यापही तो नोकरीत आहे.
Post a Comment