जमिनीशी नाळ कायम राखणारा सनदी अधिकारी..विभागीय आयुक्तांची अशीही भाजी खरेदी
औरंगाबाद : आयएएस अधिकारी म्हणजे सगळा तामझाम, हाताखाली नोकरचाकर, सर्व शासकीय सोयीसुविधा असाच सर्वसाधारण समज असतो. पण असे असले तरी काही अधिकारी जमिनीशी असलेले आपले नाते घट्ट जुळवून ठेवतात. सध्या सोशल मिडियावर औरंगाबादचे विभागीय आयुक्त असलेले सुनिल केंद्रेकर यांची काही फोटो चांगलेच व्हायरल झाले असून त्यांचे कौतुक होत आहे. यात केंद्रेकर थेट आठवडी बाजारात जावून सर्वसामान्यांप्रमाणे भाजी खरेदी करताना दिसून येतात. पत्नीसह बाजारात भटकंती करून निवडून पारखून भाजी करीत केंद्रेकर यांनी भाजीपाल्याने भरलेली पिशवी थेट आपल्या खांद्यावर घेतली. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील बाजारातील हे फोटो पाहून डावून टू अर्थ व्यक्तीमत्त्व म्हणजे काय याचीच प्रचिती येते.
केंद्रेकर हे मुळातच शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले आहेत. एक कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा प्रशासनात दबदबा आहे. असे असले तरी व्यक्तीगत जीवनात ते तितकेच साधे व सर्वसामान्यांप्रती आस्था असलेले आहेत. त्यामुळे पदाचा कोणताही रूबाब न दाखवता ते सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळून जातात. केंद्रेकर यांच्या या फोटोला मोठी दाद मिळत असून अधिकारी असावा तर असा...अशीच सामूहिक प्रतिक्रिया उमटत आहे.
Post a Comment