बाळ बोठेला मंत्र्याकडून अभय ?, रेखा जरे यांच्या मुलाने व्यक्त केला संशय
नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणाची चौकशी रेंगाळली असल्याने संशय बळावत आहे. या प्रकरणात बाळ बोठे याला लपविण्यासाठी एखाद्या मंत्र्याने ताकद लावली असावी, असा संशय जरे यांचा मुलगा रुणाल याने व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना वकील सचिन पटेकर यांच्यामार्फत प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गुन्हा घडल्यापासून बोठे हा फरार झालेला आहे. आतापर्यंत त्याला अटक झालेली नाही. तसेच त्याचा ठावठिकाणाही पोलिसांना सापडलेला नाही. हे प्रकरण राज्यभरात गाजत असताना, त्याला अभय देण्याचा प्रयत्न होत आहे.
बोठे याचा इतिहास पाहिला असता, त्याला शासकीय वरदहस्त आहे का, त्यातून पोलिस यंत्रणेवर दबाव येतोय का, पोलिस यंत्रणा गोंधळलेली आहे का, काही पोलिस अधिकारी बोठेला मदत करत आहेत का ? असे विविध प्रश्न समोर येत आहेत. याचे उत्तर आतापर्यंत मिळू शकलेले नाही. याचा अर्थ असा की, बोठेने स्वतःच्याच नियंत्रणात सगळी परिस्थिती ठेवल्याचे दिसते, असेही रुनाल जरे याने म्हटले आहे.
Post a Comment