अघोरी प्रकारासाठी दहा नखं असलेल्या घुबडांची तस्करी करणारी टोळी अटकेत

 अघोरी प्रकारासाठी दहा नखं असलेल्या घुबडांची तस्करी करणारी टोळी अटकेत



नगर : जादुटोणा सारखे अघोरी प्रकार करण्यासाठी पायाला दहा नखं असलेल्या घुबडांची तस्करी करणारी टोळी जामखेड पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून एक घुबड ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम व परंडा तालुक्यातील हे आरोपी आहेत. त्यांच्याकडे दुर्मिळ असे घुबड आढळून आले. त्या पक्ष्याच्या पायाला दहा नखे आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग जादुटोणा करण्यासाठी होऊ शकतो. अशा पक्ष्याला चांगली किंमत मिळते. त्यामुळे आरोपी ती पकडून विकतात. हा प्रकारही तसाच असल्याचा संशय असल्याचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले. जामखेड शहरातील मिलिंदनगर भागातील मोकळ्या जागेत सहा जण पक्ष्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या पथकाने तेथे छापा घातला. तेथे आरोपी हरी नेमीणाथ काळे (रा. सामानगाव ता. भूम), लखन उर्फ लक्ष्मण सतीष भोसले (रा. भवनवाडी ता. भूम), राहुल निवृत्त पवार व गणेश निवृत्ती पवार (दोघे. रा. काशिमबाग. ता. परांडा), दीपक राजाभाऊ गायकवाड (रा. सिद्धेश्वर नगर, बीड) व ज्ञानेश्वर निवृत्ती पवार (रा. परांडा) यांना पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे एका पिशवीत घुबड आढळून आला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post